आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक: अहमदनगर महापालिकेत पुन्हा येणार ‘मिस्टर राज’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत 68 पैकी 34 जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित काही सर्वसाधारण जागांवरही महिला उमेदवार नशीब अजमावणार आहेत. काही विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी आतापासून घरातील महिलांना निवडणुकीचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. निवडून आलेल्या महिला नगरसेविकेचा कारभार मात्र पूर्वानुभवानुसार पतीराज सांभाळणार आहेत. त्यामुळे महिलांचे पारडे कितीही जड असले, तरी महापालिकेत पुन्हा आधीप्रमाणेच ‘मिस्टर राज’ सुरू होणार आहे.

मागील निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव होत्या. यावेळी मात्र महिलांसाठी प्रथमच 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित 20 सर्वसाधारण जागाही महिलांना लढवता येतील. महापालिकेत सध्या 26 नगरसेविका असून एका नगरसेविकेचे पद (बुरूडगाव) रद्द झाले आहे. महापौर, उपमहापौर व महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी महिला विराजमान आहेत. असे असले तरी अगदी सुरूवातीपासून सर्व कारभार त्यांच्या पतीराजांच्याच हातात आहे. इतर नगरसेविकांचा कारभार त्यांचे पतीराजच सांभाळतात. केवळ सभागृहात बसण्याचा अधिकार या नगरसेविका व पदाधिकार्‍यांकडे आहेत.

निवडणुकीनंतर या स्थितीत फारसे बदल होणार नाहीत. उलट नगरसेविकांची संख्या वाढल्याने ‘मिस्टर राज’ अधिक बळकट होणार आहे. राखीव जागांनुसार राजकीय पक्षांना प्रत्येक प्रभागात एक महिला उमेदवार उभी करावी लागणार आहे. महिला उमेदवार शोधण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राखीव जागांमुळे काही विद्यमान नगरसेवकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच आपल्या कारभारणीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष अथवा दुसर्‍या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार अनेकांनी केला आहे. महापालिकेत प्रथमच 50 टक्के आरक्षण मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महापौरपदासाठी पुन्हा सोडत?
महापौरपदाचे आरक्षण शासनाने जाहीर केले आहे. हे पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव आहे. मात्र, महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव झाल्याने महापौरपदाचे आरक्षण पुन्हा काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत शासनच निर्णय घेणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले. पुन्हा आरक्षण काढल्यास महापौरपद महिलेसाठी राखीव राहण्याची शक्यता आहे.

लुडबूड बंद करावी
पूर्वी घराणेशाहीला महत्त्व होते. या निवडणुकीत मात्र 50 टक्के आरक्षण असल्याने तळागाळातील महिलांचा उमेदवारीसाठी विचार होईल. महिलांनी स्वतंत्रपणे कारभार करणे गरजेचे आहे. पतीराजांनी त्यांची लुडबूड बंद करावी. तसे झाले तर महिला स्वत: निर्णय घेऊन नक्कीच शहराचा चेहरा बदलवतील. राजकीय पक्षांनीही लुडबूड करणार्‍या पतीराजांवर वचक ठेवायला हवा.
-सविता मोरे, महिला शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

चुकीची प्रथा बंद होईल
सक्षम महिलांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 80 टक्के नगरसेविकांचा कारभार पतीराज सांभाळतात हे सत्य आहे. या निवडणुकीनंतर पतीराजांनी महिलांना स्वतंत्रपणे कारभार करू द्यावा. त्यासाठी सुशिक्षित महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या महिलांना संधी देणे गरजेचे आहे. या महिला नक्कीच स्वत:चे निर्णय स्वत: घेतील. त्यामुळे ‘मिस्टर राज’ ही चुकीची प्रथा नक्की बंद होईल.’’ - -सुरेखा विद्ये, महिला प्रदेश सचिव, भाजप