आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायुसेना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी जाणून घेतले विमान उडण्याचे तंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विमान नेमके उडते कसे, त्याचे तंत्रज्ञान काय असते हे जाणून घेताना शाळकरी मुलांसोबतच उपस्थित तरुणही भारावून गेले. शिवाय टाकाऊ वस्तू, कागद आणि थर्माकोलपासून तयार केलेले विमान 200ते 300 फुटांपर्यंत स्वत: उडवताना शाळकरी विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. प्रत्येक प्रात्यक्षिक विद्यार्थी कुतूहलाने न्याहाळत होते.
भारतीय वायुसेना दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण विभागातर्फे नगरसेवक पंकज भारसाखळे यांच्या सहकार्याने स्मृतिवन, नाथ प्रांगण, आर. बी. हिल्स येथे बुधवारी एअरो मॉडेल शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुमारे 2000 हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या वेळी पुणे येथील एअर मार्शल ग्रुप कॅप्टन पाठक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून सोप्या पद्धतीने साधे विमान तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले. विमान तयार करताना ताकद व दिशा या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तयार केलेले विमान उडवताना हवेचा उपयोग कशा प्रकारे करायचा, हे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी पतंगाला सायकलच्या स्पोकच्या साहाय्याने विमानाचे रूप देऊन ते उडवून दाखवले. कागदांपासून तयार केलेले विमान 200 ते 300 मीटरपर्यंत उडू शकते याचे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. या वेळी विविध लढाऊ विमनांविषयीही कॅप्टन पाठक यांनी माहिती दिली. ते म्हणाले प्रेरणा, माहिती व तयारी या तीन गोष्टींद्वारे विद्यार्थ्यांना वायुसेनेत येण्यास प्रोत्साहित करण्याचा आमचा मानस आहे. अपुऱ्या माहितीमुळेच अनेक इच्छुक तरुण वायुसेनेत येत नाहीत. औरंगाबादेतही भारतीय सैनिक दलात भरती होण्यासाठी कायमस्वरूपी सैनिकी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विक्रमकुमार, उपजिल्हाधिकारी राजपूत, निवृत्त विंग कमांडर टी. आर. जाधव, मेजर चंद्रसेन कुलथे, कॅप्टन पाठक उपस्थित होते.

वायुसेना, स्त्री भ्रूणहत्येवर रांगोळ्या
दरम्यान, सैनिकांच्या मुलांतर्फे या वेळी 40 बाय 40 फुटांची भव्य रांगोळी काढण्यात आली. भारतीय वायुसेना दिनानिमित्त परिसरातील नागरिकांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन वायुसेनेवर तसेच स्त्री भ्रूणहत्यांसारख्या विषयांवर रांगोळी काढून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात छत्रपती हायस्कूल, नरेंद्र विद्यामंदिर, धारेश्वर हायस्कूल, कलावती चव्हाण स्कूल, मेहरसिंग नाईक कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जास्तीत जास्त तरुण भारतीय सैन्यदलात दाखल व्हावेत, या उद्देशाने तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.