आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेघरांसाठी हवा कायमस्वरूपी निवारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात अनेकदा वृद्ध महिला वा पुरुष रस्त्याच्या कडेला झोपलेले दिसतात. घरांचा आणि मनाचाही लहान झालेला आकार. यामुळे ज्या आईवडिलांनी लहानाचे मोठे केले ते वडीलधारेच मुलांना नकोसे होतात. घरात होणारे सततचे वाद, अपमान यास वैतागून ही मंडळी घर सोडतात. हीच बाब मनोरुग्णांच्या बाबतीतही आहे. अर्धनग्न अवस्थेतील, मिळेल ते खाणाऱ्या मनोरुग्णांना मदत करावी, घरी पोहोचवावे, त्यांच्यावर उपचार करावा, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, शहरात तशी व्यवस्थाच नाही. एक खासगी वृद्धाश्रम सोडला तर ज्येष्ठांसाठी हक्काचा निवारा नाही. मनाेरुग्णांसाठी घाटीत व्यवस्था आहे, पण तीही केवळ नावालाच. स्मार्ट सिटीचा विचार करत असताना या लोकांचा विचार होण्याची गरज आहे.

आकडे बोलतात
{२०१० मध्ये ६० वर्षांवरील लोकांची संख्या सुमारे टक्के होती. २०५० मध्ये ही संख्या १९ टक्क्यांच्या वर जाईल.
{ २०११ च्या जनगणनेनुसार ६० वर्षांवरील ४७ टक्के नागरिकांना दुर्धर आजार आहेत.
{ केवळ १० टक्के देशवासीयांनी विमा काढला आहे. ७२ टक्के आजारांमध्ये स्वत:च्या खर्चातून शुल्क अदा केले जाते.
{ ६० वर्षांवरील ७८ टक्के नागरिक मुलांसोबत राहतात, १४ टक्के पत्नी-पतीसोबत आणि टक्के एकटे राहतात.
{ ११ टक्क्यांपेक्षाही कमी ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट स्वरूपाची पेन्शन मिळते.
{ १९९९ मध्ये भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण अस्तित्वात आले. यात ज्येष्ठांचे आरोग्य आणि कल्याण अधोरेखित करण्यात आले.
{ ३१ मार्च २००७ रोजी एकात्मिक ज्येष्ठ नागरिक कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात स्वयंसेवी संस्थांमार्फत वृद्धाश्रम उभारणे, डे केअर सेंटर, मोबाइल मेडीकेअर युनिट सुरू करणे आणि अन्य गरजेच्या सेवा-सुविधा प्रदान करणे अपेक्षित आहे.
{ जागतिक बँकेच्या अहवालानुसार देशात सुमारे ते टक्के लोकसंख्या मनोरुग्ण आहे.
{ या अहवालानुसार पैकी एका कुटुंबातील एक सदस्य मनोरुग्ण आहे.
{ भारत सरकारने १९८२ मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला होता.

आश्रमात दाखल करतो
एखाद्याला कोणी विषण्णावस्थेत आढळले तर ते आम्हाला फोन करतात. आम्ही संबंधितांची विचारपूस करतो. ते घरचा पत्ता सांगण्याच्या स्थितीत नसतील किंवा घरी परतण्यास इच्छुक नसतील तर आम्ही त्यांना कोर्टाच्या परवानगीने घाटीत दाखल करतो. मनोरुग्ण असतील तर त्यांना घाटीच्या परवानगीने येरवडा रुग्णालयात हलवतो. इतरांना मदर तेरेसा आश्रमात दाखल करतो. अविनाशआघाव, पोलिसनिरीक्षक, गुन्हे शाखा
मनोरुग्णाचे करावे काय?
नागेश्वरवाडीतील स्नेहाली कुलकर्णी हिला एकदा विद्यापीठात जाताना पालिका मुख्यालयाच्या नाल्याजवळ अर्धनग्न अवस्थेतील एक महिला पडलेली दिसली. नेमके काय झाले हे तिच्या लक्षात येत नव्हते. प्रत्येक जण बघून निघून जात होता. काहींनी गर्दीही केली, पण मदत करायला कोणीच तयार होत नव्हते. तिने लगेच पोलिस आणि रुग्णवाहिकेला फोन केला. पोलिसांनी महिलेला घाटीत दाखल केले. तिच्यावर उपचार केले. ही महिला मनोरुग्ण होती. तिला स्वत:च्या घराचा पत्ताही सांगता येत नव्हता. तिला नेमके कोठे पाठवावे, हा प्रश्न पोलिसांना पडला होता.
आजोबा घरी परतले
बी-सोशलया संस्थेचा कुणाल त्याचे मित्र थंडीत चादरी वाटप करण्यासाठी रेल्वेस्टेशन परिसरात गेले होते. तेथे त्यांना एक आजोबा दिसले. आजोबा चांगल्या घरातील होते. मुलासोबत वाद झाल्याने ते घरातून बाहेर पडले होते. मला घरात परतायचे नाही. काहीही करून माझी कुठेही सोय करून द्या, अशी विनवणी ते कुणालला करत होते. कुणाल दिवसभर फिरला. त्याने चौकशी केली. मात्र, आजोबांसाठी शासनाची अशी कोणतीच सोय नसल्याचे त्याच्या लक्षात आले. शेवटी दाेन दिवसांनी आजोबा आपल्याच घरी परतले.
या संस्थांचा तात्पुरता आधार
शहरातील विविध भागांमध्ये घरातून हाकलून दिलेले ज्येष्ठ नागरिक, मनोरुग्ण फिरताना दिसतात. ‘डीबी स्टार’कडे अशा लोकांना मदतीसाठी नेमके काय करावे, याच्या चाैकशीसाठी अनेकदा विचारणा होते. याबाबत माहिती घेतली असता शहरात अशा लोकांसाठी शासनाची कोणतीच व्यवस्था नसल्याचे लक्षात आले. मात्र, काही संस्था आणि काही दानशूर मंडळी या गरजूंना मदतीचा हात देतात. अर्थात, ही कायमस्वरूपी व्यवस्था नाही, हेदेखील तेवढेच खरे.

१.मदर तेरेसा आश्रम
अनाथ,अपंग, मरणासन्न, मनोरुग्ण आणि आजारी लोकांसाठी सेव्हन हिल्सजवळ मिशनरीज आॅफ चॅरिटीजचा संत मदर तेरेसा आश्रम चालवला जातो. ३० वर्षांपूर्वी निराधार महिलांसाठी, तर १४ वर्षांपूर्वी पुरुषांच्या आश्रयगृहाला परवानगी मिळाली. आश्रमात अनेकांना गंभीर स्वरूपाचे आजार असणारे सदस्य आहेत. त्यांची येथे सेवाशुुश्रूषा होते. एमजीएम तसेच सेंट अॅन्स रुग्णालयात उपचारही होतात. पूर्वी कोणालाही थेट आश्रमात गरजूंना दाखल करण्याची सोय होती, परंतु आता पाेलिसांमार्फत आलेले रुग्णच येथे दाखल केले जातात.
पानवर
२.दयावान आश्रम
महेमूदशहा सांडू शहा हे स्वत: कफल्लक, पण ते आजारी, वृद्ध आणि बेवारस लोकांसाठी मोफत दयावान अनाथाश्रम चालवतात. फुलंब्री रोडवरील सावंगीच्या पुढे नायगाव-टी पॉइंटजवळ हा आश्रम आहे. या लोकांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा आणि रात्री जेवण दिले जाते. झोपण्यासाठी गादी, उशी आणि पांघरूणाची सोय आहे. आवश्यकतेप्रमाणे गरजंूना घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. रस्त्याच्या कडेला कोणी अनाथ, वृद्ध, गरजू, आजारी दिसले तर ८४८४०३४१३१ वर संपर्क करता येईल.

महिलांसाठी अल्पनिवास
दंतचिकीत्सकडॉ. अर्चना गणवीर यांच्या कौन्सिल फाॅर रूरल टेक्नॉलाजी अँड रिसर्च इन्सिट्यूटच्या वतीने ४५ वर्षांखालील महिलांसाठी मोफत अल्पनिवासगृह चालवले जाते. पतीसोबतचे भांडण, कौटुंबिक हिंसाचार, कुमारी माता यासारख्या अनेक कारणांमुळे घर सोडावे लागणाऱ्या महिलांना येथे प्रवेश मिळतो. केंद्र शासनाच्या केंद्रीय समाज कल्याण बोर्ड आणि महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत २००७ मध्ये ३० महिलांची क्षमता असणारे सेजल अल्पनिवासगृह हर्सूल येथे सुरू करण्यात आले. महिला थेट येथे दाखल होऊ शकतात. येथे वर्षांपर्यंत राहण्याची सोय होते. महिलांना आपल्या वर्षांपर्यंतच्या मुलांसह येथे राहता येते. त्यावरील वयाच्या मुलांना बालगृहात पाठवले जाते. तर यापेक्षा जास्त वयाच्या मुलींना येथे आईसोबत राहता येते. येथे दोन वेळचे जेवण आणि राहण्याची मोफत सोय आहे. तसेच अारोग्य सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशनही केले जाते. महिलांना संस्थेमार्फत स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरी, व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाते. पोलिस खाते, महिला बाल कल्याण समिती, स्वयंसेवी संस्था, स्टेशन, रूग्णालये आदींमार्फतही येथे महिला पाठवल्या जातात. ०२४०-२३७१२९५ या क्रमांकावर संपर्क साधून येथे दाखल होता येते.

रात्र निवारागृहे
भिकारी,अनाथ लोकांसाठी महापालिकेच्या वतीने रेल्वेस्टेशनजवळ आणि गांधीनगर येथे दोन रात्रनिवारागृहे चालवली जातात. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे २०० लोक येथे नियमित आश्रयाला राहतात. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने हे रात्रनिवारे सुरू आहेत. या ठिकाणी झोपण्यासाठी सतरंजी, पांघरण्यासाठी चादर, शौचालय आणि बाथरूमची सोय आहे. गरजूंसाठी आरोग्य सुविधाही पुरवली जाते. व्यसनमुक्ती, आरोग्याच्या चांगल्या सवयी याविषयी त्यांचे प्रबोधनही केले जाते. रात्री प्रमाणेच येथे दिवसाही राहता येते. चहा, नाश्त्याची सोय संस्था करते. दानशूरांच्या मदतीने येथे अन्नदान केले जाते.

मातोश्री वृद्धाश्रम
कांचनवाडीपरिसरात तापडीया ट्रस्टच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम चालवले जाते. येथे काही शुल्क भरून ज्येष्ठांना राहता येते.

चेंबूरचे बेगर्स होम
मुंबईतीलचेंबूर उपनगरात गरीब अनाथांसाठी बेगर्स होम चालवले जाते.
-शहरात व्यवस्था नाही
^अनाथ,कुटूंबातून बाहेर पडलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा मनोरूग्णांसाठी शहरात कायमस्वरूपी एकही निवारागृह नाही. काही संस्थांमध्ये तात्पुरती सोय होते. मनोरूग्णांचे तर अधिक हाल होतात. शासनानेच अशी कायमस्वरूपी सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
डॉ. हेमलता कुलकर्णी, आपुलकी समाजसेवा संस्था
दोन दिवस आजी रस्त्यावर
दोन महिन्यांपूर्वी एका वृद्ध महिलेला तिच्या मुलांनी पीरबाजार परिसरात आणून टाकले होते. या आजीबाई अत्यंत स्वाभिमानी होत्या. दिवसभर रस्त्याच्या कडेला पडून राहिल्या. सायंकाळी माधवी शिरोडकर यांनी आजीबाईंना मदतीचा हात दिला. त्यांना अापल्या अपार्टमेंटमध्ये आणले. गादी आणि पांघरूण दिले. एका संस्थेत त्यांना दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या एनओसीशिवाय हे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आजींना घाटीत उपचारासाठी नेले. दुसऱ्या दिवशी नारेगावातून त्यांच्या मुलांना शोधून आणले आणि आजींना घरी पाठवले.