औरंगाबाद - राज्यातील १० विमानतळांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर असली तरी याचा विपरीत परिणाम औरंगाबादवर होणार आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत शिर्डीहून विमानसेवा सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यामुळे दिल्ली आणि हैदराबादहून थेट शिर्डीला विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे साईभक्तांची सोय होणार असली तरी औरंगाबादला दक्षिण भारताशी जोडणारी एकमेव ट्रूजेटची सेवाही भविष्यात बंद होऊन हैदराबाद-शिर्डी अशी सुरू होऊ शकते. यामुळे केवळ तीनच शहरांशी असणारी औरंगाबादची एअर कनेक्टिव्हिटी घटून पुन्हा दिल्ली, मुंबई या दोनच शहरांवर येऊ शकते.
शिर्डीसह महाराष्ट्रातील दहा विमानतळांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय अाणि भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाशी करार केला. यात शिर्डीसह नांदेड, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग येथील विमानतळांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरपासून शिर्डी विमानतळावरून सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
ट्रूजेटकंपनीचे तळ्यात-मळ्यात
२६ जुलै २०१५ रोजी औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती सेवा सुरू करताना ट्रूजेट कंपनीनेआपले लक्ष्य तिरुपती-शिर्डी असे असल्याचे सांगितले हाेते. ही सेवा औरंगाबादहून तिरुपतीला जाणाऱ्या तर हैदराबादहून शिर्डीला येणाऱ्या भाविकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आली. आजघडीला तिरुपतीला जाताना औरंगाबाद-हैदराबाद हा पहिला टप्पा येतो, तर सुमारे चार तास थांबून तिरुपतीच्या प्रवासासाठी दुसरे विमान घ्यावे लागते. परतीच्या प्रवासात मात्र थेट तिरुपतीहून औरंगाबादला विमान मिळते. औरंगाबादला आल्यावर ट्रूजेटच्या लक्झरी बसने प्रवाशांना शिर्डीला नेण्यात येते. परतीचा प्रवासही याच बसने होतो. मात्र, शिर्डीचे विमानतळ सुरू झाले तर प्रवाशांना ने-आण करण्याचा हा त्रास वाचणार आहे. तिरुपतीहून थेट शिर्डी विमानसेवा सुरू करणे कंपनीला फायदेशीर ठरू शकते. यामुळे भविष्यात हैदराबाद-औरंगाबाद विमान बंद होण्याची शक्यता आहे.
२५ टक्के प्रवासी शिर्डीचे
आजघडीला दिल्लीहून येणारे २५ टक्के प्रवासी शिर्डी आणि शनिशिंगणापूरचे असतात. त्यामुळेच इंडियन एअरलाइन्स आणि जेट एअरवेज थेट दिल्ली-शिर्डी अशी सेवा सुरू करू शकते. साईभक्तांची संख्या बघता इंडिगो आणि आणखी कंपन्याही थेट शिर्डीसाठी सेवा सुरू करू शकतात. शिर्डीच्या धावपट्टीवर छोट्या किंवा मध्यम प्रकारची विमाने उड्डाण घेऊ शकतील. याचा फायदा एअरलाइन्स कंपन्या घेण्याची शक्यता एका तज्ज्ञाने वर्तवली.