आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ परिसरात २७ एकरांवर सोलार पार्क होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विजेवर होणाऱ्या वारेमाप खर्चात कपात करणे, सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण वीज निर्मिती त्याचा वापर करण्यासाठी चिकलठाणा विमानतळ प्रशासनाने २७ एकरांवर सोलार पार्क उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ३० कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा अहवाल मुंबई वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार आहे. त्यास मान्यता मिळताच काम हाती घेतले जाणार आहे. सूत्रांच्या मते नवीन वर्षातच त्याचा शुभारंभ होईल. हैदराबाद, मुंबईनंतर औरंगाबाद सोलार पार्क उभारणारे तिसरे विमानतळ ठरेल.

राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण एमटीडीसीच्या संयुक्त सहकार्याने जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनअंतर्गत अजिंठा-वेरूळ विकास संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, कोलकाता, रायपूर, नागपूरच्या धर्तीवर २००९ मध्ये औरंगाबाद विमानतळाचा विस्तार करण्यात आला. मात्र, रायपूरच्या तुलनेत औरंगाबाद विमानतळावरून विमानसेवा सुरू होऊ शकल्या नाहीत. केवळ एअर इंडियाची दोन, जेट एअरलाइन्सची दोन आणि ट्रुजेटची मुंबई, हैदराबाद, बंगळुरू विमानसेवा सुरू आहे. सुरक्षा, दैनंदिन कामासाठी शेकडो हाय पॉवरचे हॅलोजन लाइट, ट्यूब, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक २४ तास सुरू असतात. त्यासाठी लाखो युनिट वीज लागते. महिनाभरात विजेसाठी ५० लाख रुपयांचा खर्च होतो. उत्पन्न आणि खर्चाचा विचार केला असता विजेवर अधिक खर्च होत आहे. हा वारेमाप खर्च वाचवण्यासाठी २७ एकरांवर सोलार पार्क उभारून वीज निर्मितीचा उपक्रम विमानतळ प्राधिकरणाने हाती घेतला आहे. वरिष्ठांनी परवानगी देताच पार्क उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती विमानतळ निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी "दिव्य मराठी'ला दिली.

सौरऊर्जेवरील संयंत्र उभारणार?
अपारंपरिकऊर्जा धोरण राबवून पारेषणविरहित ऊर्जा निर्मितीचे धोरण ठरले आहे. या मसुद्यावर २३ सप्टेंबर रोजी मुंबई येथे ऊर्जामंत्री चंद्रशेख बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व शासकीय-निमशासकीय इमारतींवर सौरऊर्जा संच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंपाकासाठी सौरऊर्जेवर आधारित १.५ लाख चौ. मी. संयंत्रे उभारली जाणार आहेत. या योजनेतून विमानतळ प्राधिकरणाला प्रथम प्राधान्य मिळाले तर सोलार पॅनल उभारण्याचे काम आणि सरकारचा उद्देश सफल होईल. कारण इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पावले उचलली नाहीत. विमानतळ प्राधिकरणाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विनाविलंब प्रस्तावाला मान्यता देऊन सोलार पार्क निर्मितीसाठी सरकारनेच पुढाकार घेतल्यास उर्वरित सर्व कार्यालयांवर सौरऊर्जा वापरास चालना मिळेल.

अनेकफायदे होणार : नवीनवर्षात विमानतळाचे १८२ एकरांवर विस्तारीकरण अपेक्षित आहे. नाइट पार्किंग, प्रशिक्षण हब, पुणे, मुंबई, गोवा, जयपूर, उदयपूर, दिल्ली, श्रीलंका, चीन, जपान, कार्गो आदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रस्तावित आहेत. त्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवण्यात येणार आहे. फार्मा टर्मिनल लवकरच उभारले जाणार आहे. तेव्हा विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे विजेचा खर्च ३० लाखांनी वाढेल. तीन वर्षांतील अपेक्षित वीज बिलाच्या रकमेतच ३५ वर्षांच्या विजेची तरतूद सोलार पार्कच्या माध्यमातून होईल. त्यावर वर्षाला कोटी रुपये याप्रमाणे ३० वर्षांत २७० कोटींची बचत होईल. शिवाय सौरऊर्जेमुळे विजेचा लपंडाव, जनरेटरवरील खर्च, मनस्ताप, वीज बिल भरण्याची कटकट राहणार नाही.

केंद्राकडूनप्रयत्न : अडगळीतपण सर्व सेवासुविधांनी परिपूर्ण असलेल्या औरंगाबाद विमानतळाचा अधिकाअधिक वापर करून घेणे उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.