फर्दापूर - परिसरात मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरातील डोंगराला भेगा पडल्या असून काही ठिकाणी ठिसूळ झालेल्या डोंगरमाथ्यावरून मोठमोठे दगड निखळून पडल्याची घटना घडली. वन विभागाच्या अखत्यारीत येणार्या या परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेकरिता वन विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा बघण्यासाठी येणार्या पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे.
लेणी परिसर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतो, तर येथील उद्यान, सप्तकुंड धबधबा व वाहनतळाकडे जाणारा रस्ता हा वन विभागाच्या अखत्यारीत येतो. या परिसरात ठिसूळ झालेल्या डोंगरमाथ्यावरून मोठमोठे दगड व दरडी निखळून पडले आहे. या कोसळणार्या दगडांनी अनेक ठिकाणी बांधलेले सुरक्षा कठडे तुटले आहे.