आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद क्रिकेट संघटनेच्या वादाने अजय शिर्के नाराज!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (एडीसीए) अंतर्गत वादामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजय शिर्के नाराज झाले आहेत. औरंगाबाद क्रिकेट संघटनेच्या सर्व आजीव सदस्यांनी क्रिकेट आणि खेळाडूंसाठी एकत्र यावे. सर्वांनी एकत्र येऊन आपसातील वाद संपुष्टात आणून संघटना घटनेनुसार चालवावी, अशी सूचनाही या वेळी अजय शिर्के यांनी केली आहे.

एमसीएचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेतली. एडीसीएचे आजीव सदस्य किरण जोशी यांनीसुद्धा अजय शिर्के यांना पत्र लिहून एडीसीएतील घटनाबाह्य कामांची माहिती दिली देऊन पालक संघटना म्हणून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.एडीसीएने घटनाबाह्य ‘कार्याध्यक्ष’पदाची निर्मिती करून त्या पदावर नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. संघटनेचे आजीव सदस्य किरण जोशी, डॉॅ. शांतीलाल संचेती, सुभाष अत्री, विजय संकेत, मोहन बोंबले यांनी संघटनेच्या घटनाबाह्य कामावर टीका करताना त्वरीत निवडणुका घेण्याची मागणी केली.

एमसीएचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी एडीसीएच्या घटनाबाह्य कामाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिर्के म्हणाले, ‘औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेत जे काही घटनाबाह्य काम सुरू आहे, ते त्वरित थांबायला हवे. संघटनेने घटनेनुसारच चालावे. वर्तमानपत्रातील बातम्या वाचून खेळ आणि खेळाडूचे नुकसान होत असल्याचे दिसते. हे सर्व चित्र बघून मी अत्यंत निराश झालो आहे. संघटनेतील आजीव सदस्यांनी एकत्र येऊन जे काही वाद आहेत, जे संपवण्याचा प्रयत्न करावा. खेळाचे नुकसान होऊ नये.’
भोगले यांनी सर्वसाधारण सभा बोलावून ताबडतोब निवडणूक घ्यावी. सर्व आजीव सदस्यांना विश्वासात घ्यावे. संघ निवडीची प्रक्रिया पारदर्शक करावी. संघटनेने आर्थिक ताळेबंदही सदस्यांना सांगितला पाहिजे. - सतीश वकील, आजीव सदस्य.
अध्यक्षांनी त्वरित जीबी बोलावून सर्वांसमोर अडचणींची चर्चा करावी. चर्चा केल्याने अनेक प्रश्न सुटतात. एडीसीएमध्ये पदासाठी नव्हे तर युवा क्रिकेटपटूंच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. - धनजीभाई पटेल, आजीव सदस्य
बातम्या आणखी आहेत...