आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Iritated Over Western Maharashtra Water Issue

पश्चिम महाराष्‍ट्राने पाणी थांबवले म्हणताच भडकले अजित पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पश्चिम महाराष्‍ट्राने मराठवाड्याचे पाणी थांबवले असा अर्धवट प्रश्न समोर येताच उपमुख्यमंत्री तथा राष्‍ट्रवादीचे दादा अजित पवार भडकले. पत्रकाराला मध्येच थांबवत नाशिक आणि नगर जिल्हा उत्तर महाराष्‍ट्रात येतो. त्यांच्याकडे मराठवाड्याचे पाणी आहे, पश्चिम महाराष्‍ट्राकडे नाही, असा खुलासा केला.
विभागीय आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत शासकीय आकडेवारी सादर झाल्यानंतर पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध होताच, हा प्रश्न समोर आला आणि त्यावरच त्यांनी संताप व्यक्त केला. मराठवाड्याचे पाणी उत्तर महाराष्‍ट्रात अडकले असल्याचे त्यांना सांगायचे होते. मात्र नंतर लगेचच पाणी सर्वांनाच आवश्यक असते आणि प्रकरण न्यायालयात असल्यामुळे मी यावर फारसे भाष्य करणार नाही, असे सांगून विषय संपवण्याचा प्रयत्न केला.
मालमत्ता नैसर्गिकपणे वाढली : शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज सादर करताना दिलेल्या मालमत्तेच्या तपशिलात 32 कोटींचे धनी असल्याचे म्हटले आहे. 2004 मध्ये हा आकडा अवघा 3 कोटी होता. त्यावर प्रश्न उपस्थित केला असता याची तपासणी आयकर विभाग करेल, असे सांगतानाच 2003 मधील मालमत्तांचे दर व आताचे दर तपासले तर त्याचे उत्तर आपोआपच मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
बहुत झाले उमेदवार : राष्‍ट्रवादीकडून लोकसभा लढवण्यास फारसे कोणी उत्सुक नाही, असे वेळोवेळी जाहीर होते. बीडमध्येही असाच प्रकार असल्याबद्दल विचारणा केली असता, आमच्याकडे जागा कमी आणि इच्छुक उमेदवार जास्त असल्याचा दावा अजित पवार यांनी केला.
महिला मुख्यमंत्री आमदार ठरवतील
निम्म्या राज्यातील मुख्यमंत्री महिला असतील असे राहुल गांधी यांनी जाहीर केले. इकडे राष्‍ट्रवादीला सत्ता मिळाल्यास महिला मुख्यमंत्री होईल काय, या प्रश्नाला पवार यांनी बगल दिली. आमच्या पक्षात लोकशाही आहे. निवडून आलेले आमदार मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवतील, त्यामुळे यावर मी बोलू शकत नाही, म्हणत विषय संपवला.
सर्व्हे अनेक वर्षांपासून असेच
सर्वेक्षणात काँग्रेस-राष्‍ट्रवादी मागे पडत असून भाजप प्रणीत सरकार येण्याची शक्यता असल्याबद्दल पवार म्हणाले, पहिली निवडणूक लढवली तेव्हापासून मी हेच ऐकतो. आम्ही तिस-यांदा सत्तेवर आलो तेव्हाही असेच बोलले जात होते. आम्ही जनतेशी प्रामाणिक आहोत, अशा सर्व्हेचा आम्हाला काहीही फरक पडत नाही.