आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Irrigation Scam Make Drought In Marathwada Pankaja Palve

अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यांमुळे मराठवाड्यात दुष्काळ -पंकजा पालवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन योजनांमध्ये केलेल्या घोटाळ्यांमुळे मराठवाड्याला दुष्काळाला तोंड द्यावे लागल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा पालवे यांनी बुधवारी भवन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला.
भवन (ता. सिल्लोड) येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, जिल्हा परिषद गटात 51 शाखांचे व चार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर मोठे व पंचायत समिती सदस्य इद्रिस मुलतानी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रावसाहेब दानवे होते. माजी मंत्री हरिभाऊ बागडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बनकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे, दत्ता कुलकर्णी, भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आमदार पंकजा पालवे म्हणाल्या, शेतक-यांच्या भावनांची चेष्टा करणारे सरकार केंद्रात व महाराष्ट्रात आहे. सिंचन योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार अजित पवार यांनी केल्याने सिंचन योजना पूर्णत्वास जावू शकल्या नाहीत. सिंचनाचे क्षेत्र वाढले नाही. अत्यल्प पावसामुळे दुष्काळ पडल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या असत्या तर शेतक-यांवर एवढी भीषण परिस्थिती ओढवली नसती.
केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, जीवनातली व जेवणातली प्रत्येक गोष्ट या सरकारने महाग केली. शेतक-यांच्या कष्टाला न्याय नाही. शेतीमालाला भाव नाही. तरुणांना रोजगार नसल्याने आयुष्याची चांगली स्वप्ने पाहण्याची संधी नाही. महिलांवरील अत्याचार वाढले, बलात्कारी मोकाट सुटले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्यावर केंद्रात भाजपचे सरकार व नरेंद्र मोदी पंतप्रधान हेच उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. मुंडे-महाजनांनी महाराष्ट्रात भाजपला एका उंचीवर नेले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा युवकांना रस्त्यावर उतरावे लागेल, अशी भावनिक साद त्यांनी घातली. अध्यक्षीय समारोप करताना खासदार दानवे यांनी तालुक्यात पाच हजार युवकांची फळी उभी करणार असल्याचे सांगितले, तर हरिभाऊ बागडे म्हणाले, काम करणा-यांना जनता कधीही विसरत नाही.