आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशवाणी चौकातील बंद दुभाजक दहा दिवसांसाठी खुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाहतुकीची कोंडी होत असल्याने बंद करण्यात आलेले आकाशवाणी चौकातील दुभाजक शुक्रवारी १५ ऑगस्टपर्यंत खुले करण्यात आले. वाहतूक मार्ग तसेच सिग्नलच्या जागेत बदल होणार आहेत. नागरिकांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून नंतर सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
जवाहरनगर, डॉ. हेडगेवार रुग्णालय तसेच मनजितनगरकडे जाणाऱ्या वाहनांमुळे आकाशवाणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. सिग्नलची वेळ वाढवूनही समस्या सुटत नसल्याने पोलिस आयुक्त वाहतूक विभागातर्फे आकाशवाणी चौकातील दुभाजक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी असाच निर्णय घेण्यात आला होता, परंतु नागरिकांच्या तक्रारीमुळे दुभाजक खुले करण्यात आले होते. महिन्याभरापूर्वी पुन्हा आयुक्तांनी दुभाजक बंद केले. पण नागरिकांच्या तक्रारी वाढल्याचे कारण पुढे करत दुभाजक खुले करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना प्राप्त झाले. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता बॅरिकेड्स हटवण्यात आले. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही बदल करण्यात आले.

खडीमुळे वेग मंदावतो, वाहतूक खोळंबते : वाहतूक,सिग्नलमध्ये बदल करण्यात आले. दुभाजक खुले करण्यात आले, परंतु संपूर्ण आकाशवाणी चौकात पावसामुळे रस्त्याचे डांबर वर आले आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरली आहे. अनेक दुचाकीस्वार वेग जास्त असल्यास घसरून पडत आहेत. यामुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक खोळंबते. रस्त्यावर खडी तशीच राहिल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

खैरेंच्या दबावामुळे की नागरिकांच्या त्रासामुळे? : शिवसेनेचारविवारी आकाशवाणी चौकात सदस्य नोंदणी मेळावा होता. यासाठी खासदार चंद्रकांत खैरे इतर नेते येणार होते. खैरेंना तत्काळ वळण घेता यावे यासाठी शिवसैनिकांनी सर्व बॅरिकेड्स काढल्या होत्या. या वेळी तेथे उपस्थित वाहतूक पोलिसांनी कुठलाही विरोध केला नाही. तसेच पोलिस प्रशासनानेही कारवाई केली नाही. त्यामुळे खासदार, आमदारांसाठी बॅरिकेड्स खुले केल्यामुळे मोठी टीका झाली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी बॅरिकेड्स बंद राहणार असल्याचे माध्यमांना सांगितले. खासदार पोलिस आयुक्तांच्या कोल्डवॉरनंतर अचानक दुभाजक खुले झाल्यामुळे कोणाच्या दबावामुळे दुभाजक उघडण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोयीनुसार दुभाजक उघडे
वाहतूक खोळंबणे तसेच रस्ते अधिनियम सांगून पोलिस प्रशासनातर्फे शहरातील विविध ठिकाणचे दुभाजक बंद करण्यात आले. विशिष्ट अंतरावर दुभाजक असण्याचा कायदा असल्याचे सांगण्यात अाले. मात्र, प्रमुख अधिकाऱ्यांचे कार्यालय, निवासस्थान असलेल्या ठिकाणी सोयीनुसार दुभाजक खुले करण्यात आले आहे. मिल कॉर्नर चौकानंतर लगेच पोलिस आयुक्तालय पोलिस आयुक्तांचे निवासस्थान असलेल्या ठिकाणी दुभाजक खुले ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर दुभाजक खुले ठेवण्यात आले आहे. नागरिकांसाठी कायदे, तर अधिकाऱ्यांसाठी सोयीनुसार नियम असल्याची टीका होत आहे.

{ जवाहरनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील बॅरिकेड्स काढण्यात आले.
{मनजितनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आता एकेरी वाहतूक (वन वे) असेल. मनजितनगरमधून जालना रोडकडे येण्यासाठी अतुल होंडाजवळील मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
{बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौकाकडे जाण्यासाठी मनजितनगर तेथील परिसरातील वाहनचालकांना सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखालून वळण घेऊन पुन्हा क्रांती चौकाच्या दिशेने जावे लागेल.
{ चौकातील तिन्ही सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग आखण्यात येणार.
{ चिकलठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर असलेले सिग्नल मनजितनगरकडे जाणारा मार्ग वन वे केल्यामुळे ३० ते ४० फूट मागे घेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...