आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अखेरचा सम्राट’ कादंबरीत मांडला औरंगजेबाचा तुलनात्मक अभ्यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - प्रदीप म्हैसेकर यांनी लिहिलेल्या ‘अखेरचा सम्राट’ या कादंबरीत मोगल राजवटीचा अखेरचा बादशहा म्हणजे औरंगजेबाच्या व्यक्तिमत्त्वाची तुलनात्मक मांडणी केली आहे. त्यामुळे ही कादंबरी परिपक्व झाली आहे. त्यात लेखकाने अनेक संदर्भही दिल्याने ती अभ्यासपूर्ण झाल्याचे मौलाना आझाद महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. एस. व्ही. पठाण यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी (सहा जुलै) या कादंबरीचे प्रकाशन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साहेबराव खंदारे, डॉ. ऋषीकेश कांबळे, डॉ. खिजर मिर्झा, चिन्मय प्रकाशनाचे प्रकाशक विश्वंभर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कौतिकराव ठाले पाटील होते. पठाण म्हणाले की, या कादंबरीत म्हैसेकर यांनी राजा आणि माणूस म्हणून औरंगजेबचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. 741 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात 105 संदर्भ ग्रंथांचा अभ्यास लेखकाने केला आहे. हे पुस्तक सर्व वाचकांच्या पसंतीस उतरून त्यांच्या माहितीत भर पाडणारे आहे.

उत्तमसिंह पवार म्हणाले की, औरंगजेब या नावावरूनच शहराला औरंगाबाद हे नाव पडले आहे. म्हैसेकर यांच्या पुस्तकामुळे त्यांच्याविषयी असलेले गैरसमज दूर होण्यास मदत मिळेल. औरंगजेब हा एक चांगला राजकारणी होता. मात्र, आजच्या परिस्थितीत राजकारणाची अवस्था फार चिंताजनक झाली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. मिर्झा म्हणाले, औरंगजेबाने आपल्याकडील मंदिरे पाडली असा उल्लेख इतिहासात आहे, परंतु कोणती पाडली, याचा उल्लेख कुठेही नाही. औरंगजेबाने पाडलेल्या मंदिरात औरंगाबादेतील सातार्‍याच्या मंदिराचा समावेश आहे. त्यामुळे त्याला वाईट मानले जाते, परंतु या मंदिराच्या परिसरात असणार्‍या मुरळ्या वेश्या व्यवसायाकडे वळू नयेत, म्हणून त्याने कारवाई केली होती, याची माहिती फारशी कुणाला नाही. याशिवाय त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने कर आकारणीचा अभ्यास केला होता. सध्या राज्य शासन व्यापारी, नागरिकांवर अनेक कर लादते. त्याने त्याच्या काळात 73 कर माफ केले होते. डॉ. खंदारे म्हणाले की, ही कादंबरी एक साहित्यिक कलाकृती आहे. तो इतिहास नाही, हे लक्षात येते. मांडणीसाठी लेखकाने केलेला अभ्यासही कौतुकास्पद आहे.

मनोगत व्यक्त करताना म्हैसेकर म्हणाले की, या कादंबरीस ‘अखेरचा सम्राट’ हे नाव देण्यामागचा उद्देश म्हणजे पहिला सम्राट हा अशोक राजा होता. ज्याने भारतभर राज्य केले. त्यानंतर आला तो औरंगजेब. त्याच्यानंतर कुणालाही ते शक्य झाले नाही. त्यामुळे हे नाव आपण या कादंबरीस दिले आहे. विश्वंभर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रिया धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले.