आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दोन कोटींची सोने खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पावन मुहूर्त असणार्‍या अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीच्या बाजारात दोन कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाली. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी निराशाजनक चित्राची अपेक्षा मात्र शहरी ग्राहकांनी फोल ठरवली. सोन्यापाठोपाठ एसी, कूलर आणि एलसीडी टीव्ही यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात दीड ते दोन कोटींच्या आसपास उलाढाल केली.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. या दिवशी केलेली सोने, चैनीच्या वस्तू आणि वास्तूची खरेदी अक्षय्य संपत्ती ठरते, अशी र्शद्धा आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळत असते. यंदा दुष्काळामुळे फारशी उलाढाल होणार नाही, असे बोलले जात होते. उलाढाल निश्चित घटली, पण खूप निराशा मात्र बिलकूल झाली नाही.

सोन्या-चांदीच्या बाजारात सोन्याचे वळे, दागिने, मंगळसूत्र, अंगठय़ा, बांगड्या, कर्णफुले आदींना मागणी होती. त्यातही सोन्याचे वळे आणि नाणी घेणार्‍यांचे प्रमाण अधिक होते. उन्हामुळे सकाळच्या टप्प्यात सराफी पेढय़ांवर गर्दी झाली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा या पेढय़ा फुलल्या. सकाळच्या टप्प्यात सुमारे 15 टक्के उलाढाल झाल्याचे वामन हरी पेठे सन्सचे विजय शेंडे यांनी सांगितले. मराठवाड्यात अक्षय्य तृतीयेचे महत्त्व अधिक असल्याने ग्राहकांचा ओघ चांगला राहिल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र सराफा सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष दत्ता सावंत म्हणाले की, एकूण परिस्थिती पाहता ही उलाढाल ठीकठाक म्हणावी अशीच आहे. ग्रामीण भागातून शहरात सोन्याची खरेदी करायला येणार्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. औरंगाबाद सराफ संघटनेचे अध्यक्ष अशोक वारेगावकर यांनी सांगितले की, दुष्काळाचा परिणाम आहेच. शिवाय सोन्याच्या दरात होत असलेली घट पाहून अनेक ग्राहक आणखी दर घसरण्याच्या अपेक्षेने मोठी खरेदी तूर्तास टाळून मुहूर्तापुरती खरेदी करताना दिसतात.

औरंगाबादेतील सराफी पेढय़ांवर येणार्‍या ग्राहकांनीदेखील येताच दराची विचारणा करून त्यानुसार खरेदी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारपेक्षा आज सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये काहीसा उत्साह दिसून आला. औरंगाबादेत सोन्याचा दर 28 हजार रुपये प्रति तोळा होता तर चांदीचा दर 46 हजार 500 रुपये राहिला. रात्री उशिरापर्यंत औरंगाबादच्या सोन्याच्या बाजारात दोन कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाली असा अंदाज आहे.

एसी, कूलर आणि टीव्ही
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेत साधारणपणे गुढी पाडव्यासारखेच चित्र पाहायला मिळाले. एसी, कूलर आणि एलसीडी-एलईडी टीव्ही यांची खरेदी चांगली झाली. दुष्काळ आणि इतर कारणांमुळे एकूणच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेवर 1 ते 20 टक्के परिणाम झाल्याचे दिसून आले. सानिया डिस्ट्रिब्युटर्सचे संचालक पंकज अग्रवाल म्हणाले, दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या अगोदर बुकिंग करून मुहूर्तावर खरेदी केली जायची. यंदा असे बुकिंग कमी झाले. शिवाय कंपन्यांच्या ऑफरही नगण्य होत्या. यंदा ग्राहकांचा कल चैनीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेण्याऐवजी उपयोगाच्या वस्तूंवर अधिक होता. परिणामी आणखी किमान दीड महिना उन्हाळय़ाच्या झळा सोसाव्या लागणार असल्याने एसी आणि कूलर यांना जास्त मागणी होती. त्या खालोखाल एलसीडी, एलईडी टीव्हींनी मोठी उलाढाल केल्याचे पाहायला मिळाले.

वाहनांमध्ये दुचाकींवर भर
गुढी पाडव्याची तुलना करता वाहनांचा बाजार तसा थंड दिसला. चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली खरी पण म्हणावी तशी उलाढाल दिसून आली नाही. दुचाकी वाहनांमध्ये अँक्टिव्हा, स्कूटी, व्हेस्पा, प्लेझर यासारख्या स्कूटर र्शेणीतील वाहनांना अधिक मागणी होती. त्यानंतर मोटारसायकलींचा नंबर लागला.