आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे पाचशे रेल्वे प्रवाशी बचावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकोपायलट डी. जी. पवार यांच्या प्रसंगावधानामुळे जालना-नगरसोल डेमू शटलमधील पाचशेवर प्रवासी अपघातातून बचावले. बुधवारी (10 एप्रिल) सकाळी साडेआठच्या सुमारास हे थरारनाट्य घडले.


याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास जालना-नगरसोल डेमू मनमाडला जाण्याकरिता औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. दोनवर आली. याच सुमारास 8.20 वाजता ओखा-रामेश्वर एक्स्प्रेस स्थानकात दाखल झाली. एक्स्प्रेसला फलाट क्र. तीनवर घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सांधा (पॉइंट) बदलण्यात आला होता. मात्र, हा बदल अनवधानाने तसाच राहिला. पाच मिनिटांनंतरच (8.25 वा.) शटलला मनमाडकडे जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शटल रवाना होण्याच्या तयारीत असतानाच सांध्याबाबत झालेली गफलत लोकोपायलट डी. जी. पवार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ ब्रेक लावले आणि अपघात टळला. थोडाफारही उशीर झाला असता तर शटल रुळाच्या खाली उतरण्याचा धोका होता.

गार्डला थांबवले
शटलचे लोकोपायलट डी. जी. पवार यांच्यासह गार्ड अनिल पगारे यांना चौकशीसाठी औरंगाबाद स्थानकावर थांबवून घेण्यात आले. शटल पुढे नेण्यासाठी त्यांच्या जागी लोकोपायलट दीपककुमार नरियाल व गार्ड सुभाष पवार यांची नियुक्ती करण्यात आली.


तासाभराचे पर्शिम
मनमाडला डिझेल भरण्यासाठी डेमूला आज परवानगी मिळाली. मात्र, स्थानकावर नमनालाच झालेल्या या प्रकाराची माहिती मिळताच स्टेशन मास्तर अशोक निकम, सेक्शन इंजिनिअर व्ही.बी. सिंग, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक डी. डी. बईनवाड, उपनिरीक्षक ए. एल. भावले, हवालदार बी. एस. गुंजाळ दाखल झाले. शटलचे इंजिन सांध्याला भिडल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. शेवटी इंजिनच्या पुढे दोन जॉक लावण्यात आले आणि खाली आलेला सांध्याचा भाग उकलण्यात आला आणि तासाभराच्या पर्शिमानंतर शटल पूर्ववत रुळावर आली.