आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अलिगड’मुळे होणार शिवसेनेचाच फायदा, युतीतील मित्रांमध्येच वादाला तोंड फुटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खुलताबाद परिसरात प्रस्तावित केलेल्या अलिगड मुस्लिम विद्यापाठीच्या शाखेवरून आता शिवसेना भारतीय जनता पक्ष या युतीतील मित्रांमध्येच वादाला तोंड फुटले आहे. या विद्यापीठाला शिवसेनेचा प्रारंभीपासूनच कडाडून विरोध होता. तेव्हा भाजपनेही सेनेचीच भूमिका घेतली होती, परंतु आता आपसात कुरघोड्या करण्यासाठी भाजपकडून हा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी खास त्यांच्या शैलीत जुगलबंदी सुरू केली.
औरंगाबादची राजकीय तसेच धार्मिक परिस्थिती लक्षात घेता या वादाचा फायदा शिवसेनेलाच होण्याची जास्त शक्यता आहे.

सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव जिल्हा दौऱ्यावर होते. ठिकठिकाणी झालेल्या राज्यपालांच्या दौऱ्याकडे शिवसेनेने बहिष्कार टाकल्याचे चित्र होते. भाजपच्या मंत्र्यांनाही हा प्रकार आवडला नव्हता. त्यामुळे पत्रकार परिषदेत या मुद्द्याला हात घातला तेव्हा खडसे यांनी शिवसेनेला अल्पसंख्याक विरोधी ठरवले. त्याचबरोबर शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द होण्याची शक्यता असलेल्या या अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या शाखेचा अंतिम निर्णय झालेला नाही. ते येथे होऊ शकते, असे सांगत वादाला सुरुवात केली. त्यावर अलिगड मुस्लिम विद्यापीठाची शाखा औरंगाबाद परिसरात करण्याचा निर्णय केव्हाच रद्द झाला आहे, मी तो करून घेतला आहे, खडसेंना याचे स्मरण नसावे, अशा शब्दात उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांनी यास प्रत्युत्तर दिले अन् वाद पुढील काही दिवस असाच रंगणार हे स्पष्ट झाले.

निर्णय फिरवण्याची शक्यता कमीच
खडसेयांनी वक्तव्य केले असले तरी अलिगड मुस्लिम विद्यापीठाची शाखा येथे उभारण्याचा निर्णय भाजप सरकारकडून होण्याची शक्यता नाही. कारण जर भाजपने रेटून धरत येथे ही शाखा उभारली तर त्याचा फायदा शेवटी शिवसेनेलाच होणार आहे. कारण तसे झाल्यास मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होईल. त्यात भाजप मागे पडेल, याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळे किमान एखाद्या निवडणुकीपर्यंत भाजपने या विद्यापीठाच्या शाखेसाठी प्रयत्न करत राहावा, अशी सेना नेत्यांची इच्छा नक्कीच आहे.

व्होट बँकेचे राजकारण
याविद्यापीठाच्या शाखेला शिवसेनेचा विरोध हा स्वत:ची व्होट बँक कायम ठेवण्यासाठी आहे. मुस्लिमांना शिवसेनेचा विरोध जगजाहीर आहे. भाजपचाही त्यामुळेच विरोध होता. मात्र केवळ सेनेला विरोध करण्यासाठी हा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. हा मुद्दा पुढे केल्याने भाजपला अजिबात फायदा होणार नाही, याची कल्पना त्यांच्या नेत्यांनाही आहे. मात्र सत्तेत शिवसेना नव्हे आम्हीच वरचढ आहोत, अन् वेळप्रसंगी निर्णय बदलू शकतो, असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.