आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aligarh Muslim University Land Supervision At Khulatabad, University Usefull For Marathwada Student

अलिगड मुस्लिम विद्यापीठ : मराठवाड्यासाठी उपयुक्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभाग मागासलेला समजला जातो. केंद्र सरकारच्या यादीनुसार भारतात ज्या 100 मागासलेल्या जिल्ह्यांची नोंद आहे, त्यात मराठवाड्याच्या सर्व आठही जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्याप्रमाणे केरळ राज्यात 100% शिक्षणाचे प्रमाण आहे, त्याप्रमाणे मराठवाड्यातसुद्धा शिक्षणाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. याकरिता जास्तीत जास्त शाळा, कॉलेज, विद्यापीठे स्थापन झाल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल. परिणामी आर्थिक विकासही साध्य होईल. आधुनिक भारताच्या विकासाकरिता शिक्षणाचा विकास आवश्यक आहे.
प्राचीन काळात मराठवाड्यातील खुलताबाद हे धार्मिक शिक्षणाचे फार मोठे केंद्र होते. वेरूळ येथे ज्या लेणी आहेत, त्यात हिंदू , जैन आणि बौद्ध मूर्ती आढळतात. 7 ते 12 व्या शतकात या लेणी निर्माण झालेल्या आहेत. त्या केवळ धार्मिक अधिष्ठानापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर ते शिक्षणाचे एक मोठे केंद्र होते. 13 व्या शतकात मुस्लिम संत मोठ्या प्रमाणावर खुलताबाद येथे स्थायिक झाले. त्यामुळे खुलताबादमध्येही शिक्षणाचे फार मोठे केंद्र सुरू झाले. भारतातच नव्हे, तर जगामध्येही वेरूळ व खुलताबाद या 3 किलोमीटरच्या परिसरात जगातील प्रमुख हिंदू, जैन, बौद्ध, मुस्लिम लोकांचे धार्मिक अधिष्ठान आणि शिक्षणाचे कार्य शतकानुशतके होत होते. जगातील विविध धार्मिक एकात्मतेचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या परिसरात विविध धार्मिक संत स्थायिक झालेले होते. समाजाने गुण्यागोविंदाने राहावे असा प्रचार केला जात होता. आजसुद्धा राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी सर्वधर्मीय एकात्मता आवश्यक आहे.
अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला कायद्यानुसार केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी या भागात होणार ही बाब मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासाकरिता अत्यंत महत्त्वाची आहे. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये ‘मुस्लिम’ शब्द असल्यामुळे अनेक लोकांचा गैरसमज होतो की हे फक्त मुस्लिम लोकांच्या शिक्षणासाठी आहे. पण ही गोष्ट खरी नाही. या विद्यापीठाच्या उद्दिष्टांमध्ये स्पष्ट उल्लेख पुढीलप्रमाणे आहे : The Aligarh Muslim University is open to all, irrespective of cast, creed, religion or gender. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, या विद्यापीठात सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यामुळे मराठवाड्यातील सर्वच विद्यार्थ्यांना एकसारखा फायदा होणार आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये आठवा दर्जा आहे. त्यामुळे या विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतात व विदेशात उच्चतम स्थान आहे. या विद्यापीठात 325 पेक्षा जास्त अभ्यासक्रम आहेत. यात मेडिकल, इंजिनिअरिंग, अ‍ॅग्रिकल्चर, लॉ, लाइफ सायन्सेस, मॅनेजमेंट स्टडीज, युनानी मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय येथे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर इत्यादी स्वतंत्र विभाग आहेत. या विद्यापीठांतर्गत जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, झाकीर हुसेन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅँड टेक्नॉलॉजी इत्यादी सुरू आहेत. हे अभ्यासक्रम मराठवाड्यात सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता वाढणार आहे.
या अभ्यासक्रमांसाठी केंद्र सरकारच्या निकषानुसार शिक्षण शुल्क द्यावे लागेल. मोठ्या प्रमाणात देणगी देऊन प्रवेश घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मराठवाड्यात नसलेले विविध अभ्यासक्रम या विद्यापीठामुळे सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होईल. या विद्यापीठात मोठे स्वतंत्र सभागृह असून त्यात डॉ. भीमराव आंबेडकर हॉल, स्त्रियांसाठी सरोजिनी नायडू हॉल वगैरे 18 सभागृह आहेत. या विद्यापीठात विविध भाषा शिकवल्या जातात. त्यामध्ये संस्कृत, मराठी, हिंदी, बंगाली, तेलगू वगैरे भाषांचा समावेश आहे. या विद्यापीठाच्या संस्कृत भाषा विभागात 8 पैकी अवघे 2 मुस्लिम प्राध्यापक आहेत. हे विद्यापीठ रेसिडेन्शियल (निवासी) स्वरूपाचे असून, विद्यार्र्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात वसतिगृहे बांधलेली आहेत. या विद्यापीठात आज 60 हजार विद्यार्थी शिकत असून 2 हजार प्राध्यापकांचा संच आहे.
या विद्यापीठामुळे अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान मराठवाड्यातील सर्व समुदायाच्या विद्यार्थ्यांना प्राप्त होऊ शकेल. हळूहळू वरील सर्व अभ्यासक्रम खुलताबाद येथे या विद्यापीठाद्वारे सुरू केले जातील. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संधी प्राप्त होणार आहे आणि मराठवाड्याचा शैक्षणिक मागासलेपणा काही प्रमाणात दूर होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी व इतर सगळ्यांनी या विद्यापीठाच्या आगमनाचे स्वागतच केले पाहिजे. मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासाकरिता विविध प्रकारची विद्यापीठे येत असतील तर त्यांचेही स्वागत केले पाहिजे.
(लेखक इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)

08 वा दर्जा
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये आठवा दर्जा आहे.
त्यामुळे या विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतात व विदेशात उच्चतम स्थान आहे.
325 अभ्यासक्रम
या विद्यापीठात 325 पेक्षा जास्त अभ्यासक्रम आहेत. त्यात मेडिकल, इंजिनिअरिंग, अ‍ॅग्रिकल्चर, लॉ, लाइफ सायन्सेस, मॅनेजमेंट स्टडीज, युनानी मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी इत्यादींचा समावेश आहे.

विशेष कायदा
भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड लिट्टन यांनी अलिगडमध्ये 8 जानेवारी 1877 रोजी मोहंमदन अँग्लो ओरिएंटल (एमएओ) कॉलेजची पायाभरणी केली. या कॉलेजच्या स्थापनेसाठी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सर सय्यद अहमद खान यांनी परिश्रम घेतले. या कॉलेजचेच पुढे अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर करण्यात आले. त्यामुळे सर सय्यद अहमद खान यांना या युनिव्हर्सिटीचे जनक मानले जाते. 1920 मध्ये एमएओ कॉलेजला एका विशेष कायद्यान्वये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आणि त्याचे नामकरण अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असे करण्यात आले. या कायद्याच्या कलम 2 (1) प्रमाणे ‘हे विद्यापीठ म्हणजे एक अशी संस्था जी भारतातील मुस्लिमांनी त्यांच्या आवडीचे शिक्षण देण्यासाठी स्थापन केली आहे.’
अलिगड विद्यापीठ होऊ देणार नाही : खैरे
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे अडथळे दूर करणार : फौजिया
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शूलिभंजनमध्ये जागा