आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aligarh University Possible In Aurangabad, It Won't Cancel

औरंगाबादेत अलिगड विद्यापीठ होऊ शकते, ते रद्द झाले नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात अलिगड विद्यापीठाचे उपकेंद्र रद्द झाल्याची माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दहा महिन्यांपूर्वी दिली होती. ती सपशेल खोटी असल्याचा गौप्यस्फोट महसूल अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी (२१ सप्टेंबर) केला. उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव अद्याप रद्द झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शिवसेनेच्या गडात खळबळ उडाली आहे. खडसेंचे वक्तव्य म्हणजे भाजप विरुद्ध सेना संघर्षाची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

चार वर्षांपूर्वी तत्कालीन आघाडी सरकारने खुलताबाद येथे अलिगड विद्यापीठ उभारणीची तयारी सुरू केली होती. शिक्षण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन जागेची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना तसा प्रस्तावही सादर करण्यास सांगितले होते. त्याला शिवसेनेकडून जोरदार विरोधही झाला. त्याची नोंद अलिगड विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने घेऊन औरंगाबादेत विद्यापीठ उभारणी करण्यात स्वारस्य नसल्याचे कळवल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाहीरपणे म्हटले होते. ‘१८ नोव्हेंबर २०१४ रोजी अलिगड विद्यापीठाचे कुलगुरू िब्रगेडियर सय्यद अली यांची संसदीय मंडळासमोर माझ्यासमक्ष साक्ष झाली. त्या वेळी त्यांनी विद्यापीठाचे सेंटर उघडण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले होते,’ असेही खैरे यांचे म्हणणे होते.

मात्र, खडसे यांनी आज नवे वक्तव्य करत खैरे यांची माहिती खोटी ठरवली. सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मुळात हा प्रस्ताव रद्द झालेला नाही. खुलताबाद परिसरात उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, यापूर्वीच्या सरकारने गेल्या दीड वर्षात कोणतीही कार्यवाही केली नाही. मराठवाड्यात इस्लामिक कल्चरल सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करत त्यांनी सांगितले की, अल्पसंख्याक समाजातील मुले ब्रेड विक्री, गॅरेज, वायरमन यासह अनेक कामे करतात. त्यांना कुशल मनुष्यबळ निर्मितीअंतर्गत त्यांना छोटे स्टॉल देण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० हजारांच्या आत बिनव्याजी, तर ५० हजार ते १० लाख विनाजामीन, विनातारण कर्ज देण्यात येणार आहे.
अलिगड विद्यापीठासंदर्भात खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, खडसेंची घोषणा हिंदू - मुस्लिमांत भांडणे लावण्याचा प्रकार आहे. नागपुरात आयआयएम, एम्स, आयआयटी सुरू केले जात असून आमच्याकडे इस्लामिक सेंटर कसे सुरू करता? त्यापेक्षा संस्कृत विद्यापीठ सुरू करा. औरंगाबादला संभाजीनगर नाव द्या. उगाच मुस्लिमांचे लांगूलचालन करून मराठवाड्यात जातीय भांडणे लावण्याचे काम करू नये.

मराठवाड्यात इस्लामचे तत्त्वज्ञान मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे येथील एका शहरात इस्लामिक कल्चरल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे. उर्दू साहित्य संस्कृती जपणुकीसाठी चार कोटी रुपये खर्च करून उर्दू घरदेखील उभारण्यात येणार आहे. यामध्ये उर्दू साहित्य लायब्ररी, रिसर्च अशी त्याची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी पाच एकर जागेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
छायाचित्र: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अल्पसंख्याक विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन सोमवारी कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. या वेळी उपस्थित अल्पसंख्याक कल्याणमंत्री एकनाथ खडसे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आदी मान्यवर. छाया : माजेद खान