आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 रुपये द्या आणि कोणतेही प्रमाणपत्र ताबडतोब घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक सत्राला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्रांची गरज भासत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सगळी कामे सोडून शहरातील सेतू सुविधा केंद्रांमध्ये रांगा लावत आहेत. मात्र, दुसरीकडे ‘500 रुपये द्या आणि ताबडतोब प्रमाणपत्र घ्या’, हा दलालांचा कारभार सुरू आहे. प्रशासनाचा सहभाग असल्याशिवाय हे शक्य नाही. सिडको एन-9 येथील केंद्रावर एका दलालाने पालकांची लुबाडणूक सुरू केली आहे. हा दलाल एका प्रमाणपत्रासाठी दुप्पट पैसे वसूल करत असल्याचे डीबी स्टारने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली शहरातील सेतू सुविधा केंद्रे चालवली जातात. प्रशासन पुन्हा पुन्हा दलालांच्या नादी लागू नका, नियमानुसार कामे करून घ्या, असे आवाहन करते. प्रत्यक्षात प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांचाच या दलालांवर वरदहस्त आहे. त्यामुळे या केंद्रांवर दलालांचाच कब्जा आहे. हे दलाल प्रमाणपत्र तत्काळ काढून देण्यासाठी दुप्पट पैसे उकळत आहेत. वंदना कोल्हे नावाच्या एका महिलेने सिडको एन-7 येथील केंद्रावर दलाल लुबाडणूक करत असल्याची माहिती दिल्यानंतर चमूने तपास केला. केंद्राच्या बाहेर खुर्चीत बसलेला जाधव नावाचा दलाल सर्रासपणे पालकांकडून पैसे घेऊन प्रमाणपत्रे देत असल्याचे आढळून आले. हीच परिस्थिती जिल्हाधिकारी कार्यालय, गजानन महाराज मंदिर येथील केंद्रांवरही पाहायला मिळाली.

जाधव याच्याशी झालेला संवाद
प्रतिनिधी : मला रहिवासी प्रमाणपत्र काढायचे आहे..
जाधव : यासाठी 500 रुपये द्यावे लागतील.
प्रतिनिधी : सेतू सुविधा केंद्रातून तर 60 रुपयांनाच मिळते..
जाधव : मग सेतू केंद्रातूनच काढून घ्या. मला का विचारता?
प्रतिनिधी : प्रमाणपत्र किती दिवसांत मिळेल?
जाधव : तुम्ही पैसे दिल्यानंतर तत्काळ मिळेल.
प्रतिनिधी : 500 रुपये जास्त होतात, 200 रुपये घेता का..
जाधव : कागदपत्रे द्या, लगेच तुम्हाला प्रमाणपत्र काढून देतो.

जाधव नावाच्या दलालाला केंद्रातून
पूर्वीच बाहेर काढले आहे. आमच्याकडे दलालांमार्फत कोणतीच कागदपत्रे येत नाहीत. पोलिसांचाही राउंड होतो.
-संजय निकम, व्यवस्थापक, सेतू सुविधा केंद्र, एन-7

>नागरिकांच्या सोयीसाठीच सेतू सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मात्र त्या ठिकाणी दलालांविरोधात तक्रारी आल्या. कारवाई करत आहोत. नागरिकांनीही त्यांच्याशी व्यवहार करू नये.
-गणेश निकम, मुख्य व्यवस्थापक, सेतू केंद्र

रहिवासी प्रमाणपत्रासाठी एन-9 केंद्रासमोरील दलालाने माझ्याकडून 100 रुपये घेतले. यासाठी फक्त 60 रुपये खर्च येत असल्याची माहिती कर्मचार्‍यांकडून मिळाली. अशा दलालांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
-वंदना कोल्हे