आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरच्या महापौरांसमोर आज शहराची ‘शोभा’, खड्ड्यांनीच होणार स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
औरंगाबाद - पर्यटन राजधानीत पहिली अखिल भारतीय महापौर परिषद शनिवारी होत आहे. या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यासाठी देशभरातून महापौर येणार असल्याने किमान दिखावा म्हणून आगमन मार्गांचे सुशोभीकरण, पॅचवर्क आणि गवत काढून कचरा साफ करण्याचे ठरले होते. मात्र पावसामुळे पॅचवर्क वाहून गेले आणि इतर कामे झालीच नसल्याने देशभरात शहराची ‘शोभा’ होणार असल्याची चर्चा मनपात रंगली होती. 
 
महापौरांमध्ये विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून महापौर भगवान घडमोडे यांनी या महापौर परिषदेचे आयोजन केले. या परिषदेला विविध शहरांतील २० ते २५ महापौर उपस्थित राहणार आहेत. देशभरातून येणाऱ्या महापौरांना आपले शहर स्वच्छ सुंदर दिसावे, पाहुण्यांचे शहरात चांगले स्वागत व्हावे म्हणून पाच समित्या तयार केल्या. मात्र ना स्वागत फलक लावले ना रस्त्यावरील कचऱ्याचे ढिगारे हटवले. त्यामुळे रस्त्यांवरील जीवघेणे खड्डेच पाहुण्यांचे स्वागत करतील. 

परिषदेसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री उमाशंकर गुप्ता, अ.भा.महापौर परिषदेचे अध्यक्ष विवेक सेजवळकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आमदार संजय शिरसाट, आ.अतुल सावे, आ.इम्तियाज जलील, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.सुभाष झांबड, उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृहनेते गजानन मनगटे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, गटनेते मकरंद कुलकर्णी, प्रमोद राठोड, नासेर सिद्दिकी, भाऊसाहेब जगताप आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. 
 
या ठरावांवर होणार चर्चा 
प्राधान्यानेमनपातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनपाअंतर्गत बदल्या व्हाव्यात, महापौरांना विशेष प्रशासकीय आर्थिक अधिकार द्यावेत आणि महापौर थेट जनतेतून निवडावा आदी विषयांवर या परिषदेत चर्चा होईल, असे महापौर भगवान घडमोडे म्हणाले. 
 
कमी वेळ मिळाला 
प्रशासनाने नियोजनच केले नसून दुपारी निमंत्रणपत्रिका मिळाल्या. सहा वाजेपर्यंत कशाचीच माहिती दिली नाही. किमान आगमन मार्गावर तरी चांगले कामे करणे आवश्यक होते, तेही झाले नसल्याचे घडमोडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर वेळ कमी मिळाल्यामुळे नियोजन करता आले नसल्याची कबुली त्यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...