आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच अपक्षांना वाटली शिवसेना जवळची; अपक्ष, बंडखोरांच्या बाजारात भाजपला दुसरी पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपात शिवसेनेपेक्षा फक्त चार जागा कमी मिळाल्या. त्यामुळे शक्ती वाढल्याचा साक्षात्कार झाल्याने अपक्षांच्या घोडेबाजारात जोशात उतरलेल्या भाजपला प्रत्यक्षात उलटेच चित्र पाहायला मिळाले. बहुतेक अपक्ष, बंडखोरांनी भाजपपेक्षा शिवसेनेला पसंती दिल्याने सेनेचा आकडा थेट ४२ वर पोहोचला. म्हणूनच मनपातील सत्तावाटपाच्या बोलणीत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला प्रस्ताव फारशी खळखळ न करता भाजपने मान्य केल्याचे आता समोर आले आहे.

सेनेचे २८, तर भाजपचे २२ उमेदवार निवडून आले. मग अपक्ष, बंडखोरांच्या मदतीने आपण मोठा भाऊ होऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून भाजपने अपक्षांवर गळ टाकायला सुरुवात केली. राजू शिंदे यांना मैदानात उतरवून दलित कार्ड खेळण्याचा प्रयत्नही केला. किशनचंद तनवाणी यांनीही खेचाखेचीचे जोरदार प्रयत्न केले. दुसरीकडे पालकमंत्री रामदास कदम यांनी ताकद पणाला लावली होती. अपक्ष, बंडखोरांना आमिषे, प्रलोभने दाखवण्यात आली. ही मात्रा लागू पडली. खासदार चंद्रकांत खैरेंवर नाराज असलेले गजानन बारवाल वगळता भाजपसोबत जाण्याची तयारी कुणी दाखवली नाही. परिणामी शिवसेनेचा आकडा ४० च्या पुढे गेला. तर भाजपची गाडी २६ वर अडकली होती. सोमवारी सायंकाळी हे चित्र स्पष्ट झाल्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सेनेचा सत्तावाटपाचा फाॅर्म्युला मान्य केला.

शिंदे यांना माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. अर्थात मनपाच्या अर्थकारणात महापौरांपेक्षा अधिक महत्वाचे असलेले स्थायी समितीचे सभापतिपद दोनऐवजी तीन वर्षासाठी मिळवून घेतले. या पदासाठी तातडीने मोर्चेबांधणी सुरू झाली असून त्यात पुन्हा शिंदे आघाडीवर आहेत. पुढील काळात या अपक्षांना, बंडखोरांना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध पदांवर तसेच शासकीय समित्यांवर सामावून घेण्याचे आश्वासन दिले आहे. ते पाळले गेले नाही तर ते पुन्हा भाजपकडे वळू शकतात.
बातम्या आणखी आहेत...