आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - मराठवाड्यात पावसाळा सरताना जाणवू लागलेला व आता भयंकर रूप घेतलेला दुष्काळ उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मात्र वर्षभरापासून सोबतीला आहे. वाशी तालुक्यात गेल्या वर्षी जानेवारीत सुरू झालेले टँकर्स आजही सुरू आहेत. माणसांना प्यायला पाणी मिळताना यातायात सुरू असताना जनावरांचे हाल आहेत.
राज्यात सर्वाधिक सूर्यप्रकाश झेलणारा जिल्हा अशी उस्मानाबादची ओळख आहे. आता पाणी नसलेला जिल्हा अशी त्याची ओळख होते की काय, अशी भयंकर अवस्था निर्माण झाली आहे. वाशी, भूम, परंडा हे तालुके जवळपास कोरडेठाक पडले आहेत. त्यातल्या वाशी तालुक्यात ‘दिव्य मराठी’च्या चमूने काही गावांना भेटी दिल्या तेव्हा भीषण पाणीटंचाई जागोजाग जाणवली. वाशी तालुक्याच्या एका भागात तर पाच किलोमीटरच्या टापूत यंदा पावसाचा थेंबही पडला नाही. गेल्या 28 महिन्यांपासून या भागात टँकरवरच नागरिकांची तहान भागवली जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गुडघाभर वाढलेली आणि वाळून पिवळी पडलेली ज्वारी, जळालेली कपाशी नाही तर नुसतेच रान असेच चित्र पाहायला मिळाले. चा-या साठी जनावरे घेऊन निघालेल्यांना किमान तीन-चार किमी पायपीट केल्याशिवाय चारा मिळणे अवघड झाले आहे. सध्या ज्वारी हाताशी असली तरी नंतर काय, असा प्रश्न शेतक-या ना पडला आहे. वाळून तपकिरी पडलेल्या कापसाच्या रानात एखादे तरी हिरवे रोपटे पाहायला मिळेल या आशेने जनावरे फिरताना दिसतात.
टँकरची संख्याही अपुरी
कमेश्वरी पिंपळगाव, जवळका, ब्रह्मगाव, तांदुळजा गावांची भिस्त टँकरवरच आहे. वाशी तालुक्यात 39 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. 35 टँकर्सची मागणी असली तरी 8 टँकर्स सुरू आहेत. 15 दिवसांत आणखी 10 टँकर वाढवले जातील, असे प्रशासन सांगते.
500 लिटरचे बॅरल 125 रुपयांना .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.