आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वपक्षीय नगरसेवकांनी समांतरवर मारली धडक, आता कंपनीने दिले १५ जुलैचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाण्याच्या प्रश्नावरून औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटीने दिलेला शब्द न पाळल्याने सिडको-हडकोतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी पुन्हा एकवार समांतरच्या मुख्यालयावर धडक मारली. शहराला तीन दिवसांआड पाणी देता, मग आम्हाला पाच दिवसांआड कशासाठी, असा सवाल करत हा प्रश्न सुटला नाही तर वेळप्रसंगी कायदाही हातात घेऊ, असा इशारा या संतप्त नगरसेवकांनी दिल्यानंतर कंपनीने १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे लेखी आश्वासन दिले.

सिडको-हडकोतील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना सिडको व हडको भागात पाच-सहा दिवसांआड होत आहे. त्यातही कमी दाबाने, कमी वेळ पुरवठा असे प्रकार होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. मध्यंतरी नागरिकांनी उग्र आंदोलने केल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पाणीप्रश्नावर बैठक घेऊन कंपनीला व्यवस्थित काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कंपनीनेही १ जुलैपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित करू, असे आश्वासन दिले होते. तरीदेखील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी समांतरच्या एन-१ मधील मुख्यालयात धाव घेतली. कंपनीचे उपाध्यक्ष सोनल खुराणा यांच्यासोबत या नगरसेवकांनी चर्चा केली व त्यांना कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, असे बजावले. सिडको-हडकोची पाण्याची गरज ३५ एमएलडी असताना फक्त १८ ते २२ एमएलडी पाणीच उपलब्ध होते. त्यामुळे सिडको -हडकोला हक्काचा व शहराच्या इतर भागांसारखाच तीन दिवसांअाड पाणीपुरवठा करावा. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांशी संपर्क ठेवून कामांबाबत माहिती घेतल्यास प्राधान्याची कामे लवकरात लवकर मार्गी लागू शकतील, असेही या नगरसेवकांनी सांगितले. यावर खुराणा यांनी १५ जुलैपर्यंत हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर या नगरसेवकांनी त्यांना लेखी आश्वासन मागितले. त्यावर खुराणा यांनी तसे पत्र त्यांना दिले. आजच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळात नितीन चित्ते, मोहन मेघावाले, शिवाजी दांडगे, मकरंद कुलकर्णी, विजय औताडे, सीताराम सुरे, शीतल गादगे, स्मिता नागरे, बन्सी जाधव, सीमा खरात, सुरेखा खरात, शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांचा समावेश हाेता.