कन्नड - राज्यातील कॉँग्रेस - राष्ट्रवादीतील आघाडी
सोनिया गांधी किंवा माझ्यामुळे तुटली नाही, तर मुख्यमंत्र्यांमुळे तुटल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कन्नड येथील जाहीर सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केला.आघाडी टिकवण्यासाठी मी स्वत: सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेलो होतो. सोनिया गांधी सकारात्मक विचारात होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी एकदा बैठक घेतली व उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे आघाडी तुटल्याचे त्यांनी सांगितले.
कन्नड-सोयगाव विधानसभा निवडणुकीचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारार्थ कन्नडच्या गिरणी मैदानावर जाहीर सभेत जनतेस उद्देशून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार राजेश देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते. महागाई नियंत्रणाच्या नावाखाली निर्यातबंदी करून भाजपने विश्वासघात केल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, यापूर्वी
आपण किशोर पाटील, स्व. रायभान जाधव, तेजस्विनी जाधव यांच्या प्रचारासाठी आलो होतो. हे तीनही उमेदवार निवडून आले होते. चौथ्यांदा उदयसिंग राजपूत यांच्यासाठी आलो असून त्यांचाही विजय निश्चित आहे, असेही त्यांनी सांगितले.
फुलंब्रीत प्रचारसभा
महाराष्ट्र देशाची दिशा ठरवते. यासाठी बहुमतात सत्ता पाहिजे. शेतक-यांच्या प्रश्नांची जाण असलेला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष आहे. लोकसभेत जे झाले ते वातावरण आता नाही. भरती-ओहोटीचा हा प्रकार आहे, असे पवार यांनी फुलंब्री येथील सभेत सांगितले. यापूर्वी त्यांनी खुलताबाद येथे राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले.