आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन भुताची टेकडी बनली आरोग्य केंद्र! प्राणी, पक्षीच काढतात विचित्र आवाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ती टेकडी म्हणजे कित्येक वर्षे एक रहस्य होते. मग तिचे नावच पडले भुताची टेकडी. कारणही तसेच होते. या टेकडीवरून रात्रीच्या दाट काळोखात चित्रविचित्र अावाज येत. हळूहळू कालौघात हे रहस्यही उलगडले. टेकडीवर असलेल्या जंगलातील प्राणी, पक्षीच हे विचित्र आवाज काढत असल्याचे सिद्ध झाले आणि ही बदनाम टेकडी भुताची नव्हे, माणसांची झाली. कारण, आता या टेकडीवर एका तरुण डॉक्टर दांपत्याने निसर्गोपचार केंद्र उभारले आहे. ही जागा आता भीतीऐवजी अनेक रुग्णांना मानसिक शांती देणारी ठरणार आहे.

औरंगाबादपासून ३० कि.मी.अंतरावर करमाड गावापासून जालन्याकडे जाताना दीड किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला नागोणीची वाडी फाटा लागतो. या वाडीच्या हद्दीतच ही रहस्यमय टेकडी उभी आहे. हे रहस्य असे की, गावकऱ्यांना ऐन अमावस्येच्या रात्री येथे मूल रडल्याचे, माणूस जोरात हसल्याचे आणि मध्येच बासरीचे सूर ऐकू येत. एवढ्या दाट काळोखात येणारे हे आवाज गावकऱ्यांच्या हृदयात धडकी भरवायचे.... आणि भूत उतरले! : अमर देशमुख (२८) हे व्यवसायाने डॉक्टर. पत्नी डॉ. दीपाली व तीन वर्षांची मुलगी किमयासह हे कुटुंब या टेकडीवर २०१३ मध्ये वास्तव्यास आले. डॉ. देशमुख सांगतात, निसर्गोपचार केंद्रासाठी जागेचा शोध सुरू असताना नागोण्याच्या वाडीची ही टेकडी दिसली. ही जागा भुताची टेकडी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. भुताखेतावर विश्वास नसल्याने घनदाट वनराजी असलेली येथील तीन एकर जमीन घेण्याचे ठरवले. जमीन घेतली, निसर्गोपचार केंद्रही सुरू केले.

वन्यप्राण्यांची वस्ती: टेकड्या असलेला हा हा २५० ते ३०० एकर परिसर ७०० फूट उंचीवर आहे. बहुतांश डोंगर वनखात्याच्या आखत्यारित असल्याने येथे दाट जंगल आहे. या जंगलात निलगाय, हरिणांसह तडस, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे, यासह असंख्य मोर, विविध पक्षी, नाग सापांच्या अनेक जाती आहेत.

घुबड, प्राणी काढू शकतात विचित्र, विविध आवाज : मारुती चितमपल्ली : जंगलातून येणाऱ्या आवाजाबाबत वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जंगलातील विशिष्ट प्रकारचे पक्षी, प्राणी असे आवाज काढू शकतात, असे सांगितले. ते म्हणाले, पिसाचे शिंगधारी घुबड, तडसासारखे काही प्राणी या बाबतीत तरबेज असतात. शिंगधारी घुबड वाघाचा हुबेहुब आवाज काढते. एवढेच नव्हे तर स्त्री रडल्याप्रमाणे, किंचाळण्याप्रमाणे, बाळ रडल्याप्रमाणे, विव्हळ्याप्रमाणे, शीळ घातल्याप्रमाणे, हसणे, बासरी अशा विविध प्रकारचे आवाज काढण्यात हे शिंगधारी घुबड तरबजे असते. घनदाट जंगलात या घुबडांचा अिधवास आढळून येतो. तसेच तडसासारखे प्राणीही अशा प्रकारचे आवाज काढतात.

थरारक अनुभव: या भुताच्या टेकडीवर खरेच विचित्र आवाज येतात का याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हीही घेतला. जुलैमधील अमावस्येनंतर या टेकडीवर मुक्काम केला. त्यावेळी मध्यरात्री दोनच्या सुमारास शीळ घातल्याचा आवाज तर नंतर काही वेळाने बाळ रडल्यासारखा आवाज ऐकू आला.

गाव मात्र विकासापासून दूर: नागोण्याची वाडी हे गाव विकासापासून दूर आहे. गावातील चार पाच जणच नोकरी करतात. मुलींना सातवीनंतर शिक्षण घेता येत नाही. ग्रामस्थांनी स्वखर्चाने सहा किलोमीटर रस्ता बांधला. तिन्ही बाजूंनी जंगली टेकड्यांचा वेढा असलेल्या नागोण्याची वाडी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आतुर आहे.

पुढे वाचा... समाजसेवा करायचीय