आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवाला मोठं व्हायचंय, त्याला अभ्यास करू दे! बाबासाहेबांच्या विद्वत्तेला रमाबाईंच्या त्यागाची किनार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रमा,तुला काय हवंय ते आम्ही देतो, पण भिवाला त्रास देऊ नकोस. तो सतत अभ्यासात व्यग्र असतो म्हणून राग राग करू नकोस. कारण त्याला शिकून खूप मोठा साहेब व्हायचे आहे, अशी अपेक्षा बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांनी आपली सूनबाई रमाबाईंकडे व्यक्त केली होती. सासऱ्यांनी व्यक्त केलेली तळमळ रमाबाईंनी आयुष्यभर लक्षात ठेवली आणि कधीच बाबासाहेबांकडे वेळेबाबत आग्रह धरला नाही, अशी आठवण आंबडवे गावातील बाबासाहेबांचे चुलत नातू सुदाम भागुराम सकपाळ-आंबेडकर (७५) यांनी सांगितली.
सुदाम म्हणाले, एका कार्यक्रमानिमित्त सुभेदार दापोलीपासून जवळच असलेल्या वणंद गावी गेले होते. या गावात धोत्रे कुटुंब राहते. कार्यक्रमात सुभेदारांची दृष्टी रमाबाईंवर पडली. त्यांनी ही मुलगी कोणाची आणि तिचे नाव काय? असे विचारले. त्यांच्या सहकारी मित्राने मुलीच्या कुटुंबाची चौकशी केली आणि सुभेदार धोत्रे यांच्या घरी चहा घ्यायला गेले. तुमची मुलगी आमच्या भिवाला द्या. मुलगा काय करतो? असे धोत्रे यांनी विचारले. यंदा मॅट्रिकला आहे. धोत्रे कुटुंबीयांनी कसलाच विचार करता होकार दिला. आठ ते पंधरा दिवसांत लग्नाची तिथीही ठरली. त्या काळी सुभेदार मुंबईत भायखळ्याच्या मच्छी मार्केट चाळीत राहत होते. याच ठिकाणी एप्रिल १९०८ रोजी बाबासाहेबांचा विवाह पार पडला. लग्न जुळाल्यानंतरही बाबासाहेब पुस्तकात मग्न असायचे. कोण काय करतो याकडे त्यांचे फारसे लक्ष नसायचे. आमचे वडील भागुराम बाबासाहेबांना म्हणायचे, ‘अरे, तुझे लग्न आहे. असा काय पुस्तकात व्यग्र झालास? लग्नाचा आनंद घे.’ यावर बाबासाहेबांनी त्यांच्या हातातील पुस्तक बाजूला ठेवून ते गप्पात रंगले. घरात लगीनघाई सुरू होती. बाबासाहेबांनी लग्नाच्या दिवशीदेखील हातातील पुस्तक बाजूला ठेवले नाही. लग्नानंतर प्रथेप्रमाणे देवपूजा वगैरे झाली आणि बाबासाहेब पुन्हा अभ्यासाकडे वळले, अशी आठवणही सुदाम सकपाळ-आंबेडकर यांनी सांगितली.

बाबासाहेबांच्या हातात सतत पुस्तक पाहून रमाबाई कधी कधी नाराज होत. त्यांची नाराजी सुभेदारांना कळत असे. एके दिवशी त्यांनी ‘रुक्मिणी, भिवाला खूप शिकायचे आहे. त्याला मोठा माणूस व्हायचे आहे. तो मोठा झाला की आपली सर्वांची दैना फिटेल. तुला काय हवे ते आम्हाला सांग, पण त्याला अभ्यासापासून दूर ठेवू नकोस,’ असे म्हटले. सुभेदारांचे हे वाक्य रमाबाईंनी आयुष्यभर लक्षात ठेवले. त्यांनी बाबासाहेबांकडे कधीच कोणत्या गोष्टींचा आग्रह केला नाही. बाबासाहेबांच्या विद्वत्तेला रमाबाईंच्या त्यागाची किनार आहे.