आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - वर्षानुवर्षे रखडलेल्या कामांसाठी पुन्हा तरतुदीचे गाजर दाखवून 105 कोटींनी फुगवलेला अर्थसंकल्प मनपा स्थायी समिती सभापती विकास जैन यांनी गुरुवारी (28 मार्च) सर्वसाधारण सभेत सादर केला. त्याचे सत्ताधार्यांनी कौतुक केले, तर विरोधकांनी टीकास्त्र सोडले. शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या या सभेला 60 नगरसेवक उपस्थित होते. त्यातही विकासकामांसंदर्भात जेमतेम 12 जण बोलले. हा अर्थसंकल्प आणखी फुगवून कामे समाविष्ट करण्याचे अधिकार महापौर कला ओझांना देऊन तासाभरात सभा संपवण्यात आली.
मनपा प्रशासनाने 19 मार्च रोजी 2013-14 साठी 616 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला होता. दोन दिवसांनी समितीच्या सदस्यांनी त्यावर चर्चा केली. त्यानंतर जैन यांनी करवसुलीची उद्दिष्टे व कामे वाढवली आणि 701 कोटी 50 लाख 92 हजारांची जमा व 701 कोटी 39 लाख 90 हजार रुपयांचा खर्च असा 11 लाख दोन हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. उर्वरित पान.8
पुन्हा फुगवाफुगवी
वसुलीची उद्दिष्टे वाढवली असली तरी त्यासाठी सक्षम यंत्रणा राबवण्याचे कोणतेही धोरण जैन यांनी स्पष्ट केलेले नाही. उत्पन्नाचे नवे स्रोतही शोधण्यात आलेले नाहीत. गेल्या वर्षी स्थायी समितीसमोर 492 कोटी 73 लाखांचा अर्थसंकल्प सादर झाला होता. तो समितीने 620 कोटी 39 लाखांपर्यंत तर सर्वसाधारण सभेने 786 कोटींपर्यंत नेला.
नवा संकल्प, जुनी कामे
पैठण रोडवर वारकरी भवन बांधणे - मूळ प्रस्ताव 2011
250 खाटांचे रुग्णालय बांधणे - 2007
ट्रान्सपोर्ट नगरीची उभारणी - 2006
महावीर चौक ते क्रांती चौक रस्ता डांबरीकरण - 2006
मनपाच्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग - 2008
नवे काय
- महावीर संशोधन केंद्राची उभारणी
- सर्व प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे
- रेल्वे स्टेशन येथे मनपाची ब्लॅड बँक सुरू करणे
अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. सभा सुरू होताच विरोधी पक्षनेता डॉ. जफर खान, अफसर खान आदींनी त्यावर आक्षेप घेऊन अर्थसंकल्प शिवसेना-भाजपचा की महापालिकेचा असा प्रश्न उपस्थित केला होता. सर्व वॉर्डांतील विकासकामे अर्थसंकल्पात नाहीत. महिला व बालकल्याण विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. शिक्षणासाठीही तरतूद नाही. विकासकामातून सिडको-हडको भाग वगळला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा त्रुटीयुक्त अर्थसंकल्प सादर केला आहे, असा आरोप काशीनाथ कोकाटे, नासेर कुरेशी, रेखा जैस्वाल यांनी केला. दलित, बहुजनांच्या वॉर्डांतील कामे समाविष्ट करा, असे कृष्णा बनकर म्हणाले, तर सत्ताधारी आघाडीचे गटनेते गिरजाराम हाळनोर, सभागृहनेता राजू वैद्य यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि शहराला नवी दिशा देणारा आहे, असे सांगितले. डॉ. नुर्जरत खान यांनी स्पील ओव्हरची कामे रद्द करू नयेत, अशी मागणी केली.
अर्थसंकल्प मंजूर
स्पील ओव्हरचे एकही काम शिल्लक राहणार नाही. सर्व वॉर्डांच्या विकासकामांचा समावेश करण्यात येईल. योग्य त्या दुरुस्त्या करण्यात येऊन अर्थसंकल्प मंजूर केला आहे.
कला ओझा, महापौर
अर्थसंकल्पातील तरतूद
स्थायी समिती सदस्यांच्या वॉर्डात एक कोटी, सत्ताधारी मित्रपक्ष नगरसेवकांच्या वॉर्डांत 50 लाख, तर विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डांत 30 लाखांची तरतूद केली आहे.
सव्वाशे कोटींचा स्पील ओव्हर
यंदाच्या अर्थसंकल्पात 250 कोटींचे स्पील ओव्हर (थकीत कामे) होती. ती पुढील वर्षी सुमारे सव्वाशे कोटींची असतील.
असे वाढवले 105 कोटी 38 लाख
विभाग प्रशासनाचे उद्दिष्ट स्थायीचे उद्दिष्ट
स्थानिक संस्था कर 200 कोटी 230 कोटी
मालमत्ता कर 80 100
नगररचना विभाग 45 60.30
मालमत्ता विभाग 5.15 10.7
शासकीय अनुदान 41.33 56.33
बीओटी व इतर माध्यम 30 40
पाणीपट्टी वसुली 25 35
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.