आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AMC Commissioner Design Against MP Chadrakant Khaire

जाता-जाता खासदारांना धक्का!, भापकरांनी महापौरांच्या वॉर्डातील कामे केली रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रजासत्ताकदिनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर केलेली जाहीर टीका जिव्हारी लागल्याने त्यांनी आज (28 जानेवारी) प्रभावी शस्त्र उगारले.

खैरेंच्या विरोधानंतरही पीरबाजार येथील विस्थापितांना भूखंडांचे वाटप केले, तर महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातील चार कोटी रुपयांची कामे रद्द करण्यात आली. इतकेच नव्हे तर नव्यानेच ओझा यांच्या दिमतीला देण्यात आलेले स्वीय सहायक एस. एस. कुलकर्णी यांची पूर्वीच्या जागेवर तडकाफडकी बदली केली.

खैरे यांनी आयुक्तांवर केलेले आरोप आणि प्रत्युत्तरादाखल डॉ. भापकर यांनी अधिकाराचा वापर करून दाखवलेला करारीपणा हाच पालिका वर्तुळात चर्चेचा विषय होता. खैरे यांच्या आदेशामुळे विस्थापितांना भूखंड वाटपाच्या कार्यक्रमाकडे महापौर, उपमहापौरांसह सर्व सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवली. तथापि, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी आणि संजय शिरसाट हे तीन आमदार डॉ. भापकरांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसले. विस्थापितांना भूखंड वाटप करत असताना हे तिन्ही आमदार हजर होते.

आयुक्तांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर कोणत्याही क्षणी नवीन आयुक्त म्हणून डॉ. हर्षदीप कांबळे रुजू होऊ शकतात. त्यामुळे डॉ. भापकर असा काही निर्णय घेतील, असे कोणालाही अपेक्षित नव्हते. मात्र खैरेंनी बोचरी टीका केल्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराचे अस्त्र शेवटच्या क्षणी वापरत खैरेंच्या वर्मावर घाव घातला. लोकप्रतिनिधींनी विश्वासात घेतले नाही तर अधिकारी त्यांच्या अधिकाराचा कसा वापर करू शकतात हेही त्यांनी दाखवून दिले. तथापि, हे निर्णय सर्वस्वी प्रशासकीय असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

खैरे म्हणाले होते, चालते व्हा!
आयुक्त परस्पर निर्णय घेऊन त्याची माहिता प्रसिद्धी माध्यमांना देतात, त्यामुळे महापौरांना प्रसिद्धी मिळत नाही. आयुक्तांची बदली झाली असून आता त्यांनी चालते व्हावे, असे खैरे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर शासकीय कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. भूखंड वाटप त्याच दिवशी होणार होते, परंतु खैरे यांनी आक्षेप घेतल्यामुळे शनिवारचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. रविवारी सुटी होती. त्यानंतर आज कामकाजाच्या दिवशी डॉ. भापकर यांनी खैरेंसह महापौरांना शह दिला.



वैयक्तिक रोषातून निर्णय नाही
अंदाजपत्रकात तरतूद नसल्याचे शहर अभियंत्यांनी सांगितल्यानंतर ओझा यांच्या वॉर्डातील चार कोटींची कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुरलीधर सोनवणे यांच्या मागणीवरून पीएची बदली करण्यात आली. अन्य सर्व निर्णय हे प्रशासकीय आहेत. दबाव, विरोध किंवा वैयक्तिक रोषातून हे निर्णय घेण्यात आलेले नाहीत. -
डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त.

कामे रद्द करून दाखवा
बोलावणे नसल्यामुळे आम्ही भूखंड वाटप कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. राहिला विषय महापौरांच्या वॉर्डातील कामे रद्द करण्याचा, हिंमत असेल तर आयुक्तांनी ती कामे रद्द करून दाखवावी. -
गिरजाराम हाळनोर, युतीचे गटनेते.