आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - ‘रस्ते विकासासाठी केलेल्या पाडापाडीनंतर अपूर्ण कामाची जबाबदारी कोण घेणार? आपली बदली झालेली असून नवीन आयुक्तांनी जर जबाबदारी झटकली तर गंभीर परिणामांची जबाबदारी कोणाची असेल?’ असा सवाल महापौर कला ओझा यांनी केला आहे.
सोमवारी 140 प्लॉट वाटपाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना लिहिलेल्या खरमरीत पत्रात त्यांनी दोन दिवसांत सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना केली आहे. खासदार चंद्रकांत खैरे आणि डॉ. भापकर यांच्यात झालेल्या वादावादीनंतरही आयुक्तांनी आपल्या दालनात प्लॉट वाटप केले. त्यानंतर महापौरांनी सायंकाळी आयुक्तांना खरमरीत पत्र लिहिले. यासंदर्भात त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला तर त्या म्हणाल्या, आपल्याला आणि अन्य पदाधिकार्यांना प्लॉट वाटपाविषयी अनभिज्ञ ठेवण्यात आले असून प्लॉटधारकांना अजिबात विरोध नाही. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज, शहागंज ते सिटी चौक, सिटी चौक ते गुलमंडी, मनपा ते बुढीलेन, मनपा ते भडकल गेट, मकई गेट, विद्यापीठ गेट, कैलासनगर, औरंगपुरा, भाजी मंडई, जुनाबाजार, गुलमंडी परिसरात रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पाडापाडी करण्यात आली. त्या वेळी ज्यांच्या मालमत्तांचे नुकसान झाले त्यांना मोबदला देणे तर दूरच, पण रस्त्यांचेही भिजत घोंगडे आहे. शहर भूकंपग्रस्त झाल्यासारखे दिसून येत आहे. या अपूर्ण कामासाठी कोण जबाबदार आहे, असा थेट सवाल त्यांनी आयुक्तांना विचारला आहे.
नवीन आयुक्तांनी जर जबाबदारी झटकली तर नागरिकांचा रोष कुणी सहन करायचा? फुलेनगर, जयभीमनगर, कैलासनगर येथील रहिवाशांच्याच मालमत्तेचे नुकसान झालेले नसून ज्या ज्या ठिकाणी आयुक्तांनी पाडापाडी केली, तेथील नागरिकांच्या मोबदल्याचे कामही त्याच गतीने करण्यात आले नसल्याचा ठपकाही त्यांनी आयुक्तांवर ठेवला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत आपल्यासह मनपाच्या सर्व पदाधिकार्यांना (30 जानेवारी 2013) पंचनामा, भाडेकरूंची यादी, पुनर्वसनाची कारवाई, रस्ते विकासासाठी केलेल्या खर्चाचा तपशील तातडीने देण्याचे त्यांनी सुचवले आहे. या पत्राच्या प्रती त्यांनी खासदार खैरे यांच्यासह विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनाही पाठवल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.