आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AMC Commissioner Dr. Harshadeep Kamble Press Meet In Aurangabad

आता मोर्चा स्वच्छतेकडे; मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी विशद केली भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहराचा पदभार स्वीकारला तेव्हा पाण्यासाठी सगळीकडे ओरड सुरू होती. त्यामुळे त्याच्या नियोजनामध्ये लक्ष घालावे लागले. आता पाण्यानंतर शहरासमोरची सर्वाच महत्त्वाची समस्या असलेल्या स्वच्छतेचा मुद्दा अजेंड्यावर असल्याची भूमिका मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मांडली. जिल्हा मराठी पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने शुक्रवारी (7 जून) डॉ. कांबळे यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शहर विकासाबाबत त्यांनी मांडलेली मते त्यांच्याच शब्दांत..

नियोजन आणि राज्य शासनाच्या भरीव मदतीमुळे पाणीपुरवठा दोन दिवसांआड असला तरी सुरळीत सुरू ठेवता आला. सुदैवाने पाऊस वेळेवर सुरू झाल्याने ही समस्या कमी होणार आहे. त्यामुळे आता शहर स्वच्छतेला प्राधान्य देणार आहोत. शहर विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे करायची आहेत. पण त्यासाठी पैसा लागतो. गतवर्षी शासनाच्या निधीच्या भरवशावर अर्थसंकल्प फुगवला. पण मदत मिळालीच नाही. त्यामुळे अनेक विकासकामे प्रलंबित राहिली.

या वेळी असे होऊ नये म्हणून एलबीटी, मालमत्ता व पाणीपट्टी कर, बीओटी आदींच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.

गुणवंतांना आर्थिक पुरस्कार

मनपाच्या शाळांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. नववी-दहावीची काही मुले तर काम करून शिक्षण घेतात. त्यामुळे चांगले गुण मिळवणार्‍या मुलांना आर्थिक पुरस्कार देऊन त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपक्रमांतर्गत मुलांना एक लाखापर्यंत बक्षीस दिले जाते. शिक्षणामुळेही त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागू शकतो ही जाणीव त्यांना व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. तसेच गुणवत्ता सुधारावी म्हणून नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची दर महिन्याला परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच इतर शाळांमध्येही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आईची इच्छा, डॉक्टर झालो !

लोकांची सेवा करता येते म्हणून मी डॉक्टर व्हावे अशी आईची इच्छा होती. त्यामुळे मी डॉक्टर बनलो. नोकरीही केली. पण मला प्रशासकीय सेवेत जायचे होते. त्यामुळे इकडे वळलो. लहानपणीच्या आमच्या गावातील अनेक घटना आजही माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्यातून समाजात झालेला सकारात्मक बदल जाणवतो आणि समाधान वाटते. मला गाणी ऐकायला, आत्मचरित्र वाचायला आणि बुद्धिबळ खेळायला आवडते. चांगले काम केले तर निसर्ग दुपटीने परतफेड करतो. तशी रचनाच निसर्गाने तयार करून ठेवली आहे. त्यामुळे चांगले काम करण्यावर माझा विश्वास आहे.

आयुक्तांनी मांडलेला शहर विकासाचा आराखडा असा

भूमिगत ड्रेनेज लाइन : शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावात काही त्रुटी होत्या. त्या निकाली काढून आठ ते दहा दिवसांत प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. तो मंजूर झाल्यानंतर प्रश्न मार्गी लागेल. पण काम पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील.

दोन एमएलडी पाणी : नहरींचे सर्वेक्षण दोन आठवड्यांत पूर्ण होईल. नहर-ए-अंबरीतून पावसाळ्यात दोन एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकते. त्याचा पिण्यासाठी व वापरण्यासाठी उपयोगात कसे येईल याचे नियोजन करणार आहोत.

‘त्या’ कंत्राटदाराला नोटीस : बीओटी तत्त्वावर देण्यात आलेली रेल्वेस्थानकावरील मनपाची जागा कंत्राटदाराला नको असेल तर ती ताब्यात घेण्यात येईल. त्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे.

गुंठेवारीचा निर्णय नियमाप्रमाणेच : शासनाने 2001 मध्ये ठरवलेल्या धोरणानुसार गुंठेवारी भागाचा विकास सुरू आहे. पदाधिकार्‍यांनी 2009 पर्यंतच्या वसाहतींचा समावेश करण्याची मागणी केली आहे. त्याला मान्यता मिळाली तर त्या भागांचा समावेश करून विकासाचे नियोजन केले जाईल.

धोकादायक इमारती रिकाम्या करणार : शहरातील 21 धोकादायक इमारतींना पावसाळ्यापूर्वीच नोटीस देण्यात आली आहे. मात्र ते दखल घेत नाहीत. येत्या आठवड्यात सुरक्षेच्या दृष्टीने या इमारती रिकाम्या करण्यासाठी मनपा कारवाई करणार आहे.

ग्रीन सिटीचा उद्देश : यंदा दीड लाख वृक्षांची लागवड आणि शहर सौंदर्यीकरण करण्यात येईल. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. सिद्धार्थ उद्यानाचा मास्टरप्लॅनही तयार आहे. प्राणी पाहण्याच्या उद्देशाने सिद्धार्थ उद्यान आणि मुलांना खेळण्यासाठी विवेकानंद उद्यानाचा विकास करण्यात येईल. यासह वर्षभरात शहरात किमान तीन ते चार चांगली उद्याने विकसित केली जातील.

नागपूरच्या धर्तीवर शहर रस्त्यांचा विकास : नागपूरच्या धर्तीवर शहर रस्त्यांचा विकास करण्याचा निर्धार आहे. स्कायवॉकचे दोन दिवसांत उद्घाटन करण्यात येणार आहे.

शहर अभियंता लवकरच ठरणार : तत्कालीन शहर अभियंता एम. डी. सोनवणे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी योग्य व्यक्तीची निवड जूनअखेरपर्यंत करण्यात येईल.