आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाशे कोटींची मालमत्ता दोनशे कोटींत गहाण; समांतर जलवाहिनीसाठी मनपा करणार खर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दोनशे कोटींच्या कर्जासाठी महानगरपालिका इतिहासकालीन इमारतींसह सहाशे कोटींची मालमत्ता गहाण ठेवत आहे. थकीत वीज बिल आणि समांतर जलवाहिनीच्या कामासाठी या रकमेचा वापर केला जाणार असला तरी महत्त्वाची मालमत्ता हडपण्यासाठी नियोजनबद्धरीत्या चाल खेळली जात असल्याचा आरोप विरोधी गटातील नगरसेवक करत आहेत.

मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, पण बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी ठिकठिकाणची मालमत्ता गहाण ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. काही दिवसांपूर्वी कर्जाचे शंभर कोटी रुपये उचलण्यात आले. त्यातून थकीत वीज बिल अदा करण्यात आले. उर्वरित शंभर कोटी समांतर जलवाहिनीच्या विकासकामासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळेवर मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढण्याचा प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आला. त्यावर तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी 30 जानेवारीला स्वाक्षरी करून मंजुरी दिली.

कशी करणार परतफेड ?
जनतेची मालमत्ता मनपाला मनमानी पद्धतीने वापरता येणार नाही. ज्या उद्देशासाठी कर्ज काढले आहे तो अद्याप पूर्ण झालेला नाही. पैसा असाच उधळला जात आहे. मनपाला परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे यातून दिसून येत आहे. सहाशे कोटींची मालमत्ता दोनशे कोटींत गहाण ठेवली. कर्जाची परतफेड करणार कशी, याचा विचारही केलेला नाही. प्रमोद राठोड, नगरसेवक

महापौरांचा बंगला गहाण ठेवा
शहर विकासासाठी महत्त्वाच्या मालमत्ता केवळ दोनशे कोटींत गहाण ठेवण्यात आल्या असून त्यांची बाजारभावाप्रमाणे सहाशे कोटींपर्यंत किंमत आहे. यामागे मालमत्ता हडप करण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येतो. पुढील विकासासाठी आता महापौरांचा बंगला गहाण ठेवावा. अभिजित देशमुख, नगरसेवक

कर्ज फेडण्याबाबत साशंकता
बाजारभावाप्रमाणे मालमत्तेची किंमत सहाशे ते सातशे कोटींची आहे. कर्ज चांगल्या उद्देशासाठी घेतले आहे. समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यास शहरवासीयांची दीर्घकाळ पाण्याची समस्या दूर होईल. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड होईल की नाही याविषयी साशंकता आहे, पण नियोजनबद्धरीत्या काम केले तर कर्जाची परतफेड करता येऊ शकते. संजय केणेकर, नगरसेवक

कर्जाची परतफेड करू
मालमत्ता विकलेली नाही. गरज लक्षात घेऊन कर्ज घेण्यात आले आहे. कर्जाचे हप्ते पाडण्यात आलेले आहेत. त्याची परतफेड केली जाईल. डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, मनपा