आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरांगाबाद महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपदी डॉ. जफर खान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून गेला एक महिनाभर सुरू असलेल्या वादात प्रमोद राठोड यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी यश मिळवले. राठोड यांना खो देत डॉ. जफर खान यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. ते संजयनगर बायजीपुरा प्रभागाचे नगरसेवक आहेत.
राठोड यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पद टिकवण्यासाठी प्रयत्न चालवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते नियुक्ती देण्याच्या वेळी आले नाहीत. शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांच्या उपस्थितीत डॉ. जफर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांचे पत्र असतानाही डॉ. खान यांनी 18 पैकी 12 नगरसेवक महापौर अनिता घोडेले यांच्यासमोर उभे केले. शिरगणती केल्यानंतर महापौरांनी विधी विभागाचा सल्ला घेतला. त्यानंतरच डॉ. खान यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.
संकेतानुसार विरोधी पक्षनेतेपद हे एक वर्षासाठी असते. राठोड हे दोन वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांना हटवून नव्या व्यक्तीची निवड करण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपासून करण्यात येत होती. एक महिन्यापासून मागणीने जोर धरला होता. डॉ. जफर यांचे नाव प्रथमपासूनच आघाडीवर होते. मात्र राठोड यांनी वरिष्ठ पातळीवर सूत्रे हलवून विरोधी पक्षनेते हटाव मोहीम रोखून धरली होती.