आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबर नव्हे, फेब्रुवारीत सुरू होतील रस्त्यांची कामे; आयुक्तांचा ‘ब्रेकर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात 30 कोटींचे रस्ते तातडीने करण्याच्या पदाधिकार्‍यांच्या घाईला स्पीड ब्रेकर लावण्याचे स्पष्ट संकेत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शनिवारी दिले. 30 कोटी रुपयांचा बोजा पुढील आर्थिक वर्षात करण्याचे कारण पुढे करून ही कामे जानेवारी किंवा फेब्रुवारीत सुरू करण्याचा इरादा त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे आठ डिसेंबर या पालिकेच्या वर्धापनदिनी रस्ते कामाचा शुभारंभ करण्याच्या पालिका पदाधिकार्‍यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
रस्त्यांच्या कामाची आठ डिसेंबरला शुभारंभ नव्हे, तर फक्त घोषणा केली जाईल असे स्पष्ट करत पदाधिकारी नव्हे तर आयुक्तच काय ते ठरवतील, असेही डॉ. कांबळे यांनी सूचित केले आहे. तर आयुक्तांना स्पीड ब्रेकर लावू देणार नाही, असे स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी म्हटले आहे.
शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या लौकिकावर आंदोलनातून टीका झाल्यानंतर 30 कोटी रुपये खर्च करून शहरातील काही रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याचा निर्णय झाला होता. सर्वच पदाधिकार्‍यांची तशी इच्छा होती. सर्वसाधारण सभेत निर्णय झाल्यानंतर स्थायी समितीनेही घाई करण्याचे आदेश दिले होते.

काय म्हणतात आयुक्त
कोणत्या रस्त्यांची कामे करायची याची यादी निश्चित झाली असली तरी त्याची घोषणा 8 डिसेंबरला केली जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन जानेवारी किंवा फेब्रुवारीत प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू होईल. त्यामुळे 30 कोटी रुपयांचे देयक यंदाच्या आर्थिक वर्षात देण्याची गरज पडणार नाही. काम सुरू झाल्यानंतर म्हणजेच 1 एप्रिलनंतरच हे देयक दिले जाईल. म्हणजेच 30 कोटींचा आर्थिक बोजा पुढील वर्षातच असेल.
दोन्हीही सभागृहांची मान्यता आहे, शिवाय नागरिकांचीही इच्छा आहे. त्यामुळे उगाच वेळ लावण्यात अर्थ नाही. आम्ही त्यांनी लवकर कामे मार्गी लावण्यास सांगू. ही कामे 8 डिसेंबरला सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. नारायण कुचे, सभापती, स्थायी समिती.