आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी प्राध्यापक घेतोय हिंदुत्वाच्या उदयाचा शोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नव्वदीच्या दशकात महाराष्ट्रात हिंदुत्वाचा उदय कसा झाला, हा प्रश्न मराठी माणसाला कधी पडला की नाही हे माहिती नाही, पण सातासमुद्रापार स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक थॉमस ब्लॉम हेन्सन हे 20 वर्षांपासून याचे उत्तर शोधत आहेत. मुंबई, पुण्यातील वास्तव्यात त्यांना याचे उत्तर सापडू शकले नाही. त्यामुळे ते पुन्हा महाराष्ट्रात आले असून सध्या औरंगाबाद शहराच्या दौर्‍यावर आहेत.
‘हिंदुत्वाचा उदय’ हा थॉमस यांच्या संशोधनाचा विषय आहे. 1990 च्या दशकात थॉमस काही वर्षे मुंबई आणि पुण्यात होते. मुंबईतील दंगली, बॉम्बस्फोट त्यांनी जवळून बघितले आहेत. शिवसेनेने घेतलेली मुसंडीही न्याहाळली.
20 वर्षांत काय बदल झाले हे पाहण्यासाठी ते आता पुन्हा डेरेदाखल झाले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने हिंदुत्वाच्या जोरावर मोठी मुसंडी मारली. याचे उत्तर शोधण्यासाठी ते महाराष्ट्रात आले होते. सेनेने मुंबईबाहेर औरंगाबादमध्येही आपली पाळेमुळे रोवली. त्यामुळे या शहरातही काही महिने वास्तव्य केले होते.
असा नेता बघितला नाही - औरंगाबाद येथे आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगतानाच पत्रकार किंवा संशोधकांसोबत एकदम मिश्कीलपणे बोलणारा दुसरा नेता मी बघितला नाही. हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कार करणारा हा नेता माणूस म्हणून आवडतो, असेही त्यांनी सांगितले.
मुस्लिमांची अवस्था बिकट - 20 वर्षांपूर्वी येथील मुस्लिमांची अवस्था बिकट होती. तसेच हिंदू आणि मुस्लिम असे दोन ध्रुव होते. दोनच भाषा तेवढय़ा बोलल्या जात, परंतु आता चित्र बदलले असून बंगाली बोलणाराही येथे सापडतो. हिंदू, मुस्लिम समाज एकमेकांत मिसळत असल्याची निरीक्षणेही त्यांनी नोंदवली. मात्र, संशोधनाचा निष्कर्ष त्यांनी उघड केला नाही. त्यावर भाष्य करणे घाईचे होईल, असे ते म्हणाले.
आयुक्तांबरोबर रस्त्यावर - थॉमस शुक्रवारी सकाळी पालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना भेटले. डॉ. भापकर रस्ते पाहणीसाठी जाणार होते. थॉमसही त्यांच्यासोबत गेले. त्यावर बोलताना थॉमस म्हणाले, येथील आयुक्त रस्त्यावर उतरतो, थेट सामान्यांशी संवाद साधतो ही बाब अविश्वसनीय अशी होती. नागरिकांशी थेट भेटल्यामुळे त्यांना सर्व समस्या जवळून समजतात. यावर काही जण नाराज, तर काही जण खुश होते. अर्थात मी भारावून गेलो. आमच्याकडे असे चित्र दिसत नाही.
शायनिंग इंडिया हा छोटा भाग - भारताच्या विकासासंदर्भात शायनिंग इंडिया असे चित्र निर्माण करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात भारत हा शायनिंग खचीतच नसल्याचे त्यांनी सांगितले. शायनिंगचे चित्र आशादायी असले तरी येथील मुस्लिम समाजाच्या वसाहतींमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. फक्त मुस्लिमच नाही तर भारतामधील अन्य समाजांमध्येही असेच चित्र असल्याचे थॉमस यांनी सांगितले.