आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंगाम उसाचा, गाळप मात्र राजकारणाचे! अमित शहा यांची खैरेंना भाजपत येण्याची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पैठणच्या संत एकनाथ कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे एकाच व्यासपीठावर होते. शुभारंभ ऊस गाळपाचा असला तरी शहांनी खैरेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर देऊन ‘राजकीय गाळप’ करण्याची संधी साधली. खैरेंशी वैर असलेले आमदार संदिपान भुमरेही उपस्थित हाेते.
पैठण - राज्यातील सत्तेतील सहभागावरून शिवसेना- भाजपमध्ये टोकाचा वाद सुरू असतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना ‘आमच्या पक्षात तुमचे स्वागतच’, असे म्हणत भाजपमध्ये येण्याची आॅफर दिली.

‘संत एकनाथ’च्या गळीत हंगामाचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या वेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खैरे, चेअरमन व आमदार संदिपान भुमरे उपस्थित होते. त्या वेळी शहांनी ही ऑफर दिली. मात्र, खैरे यांनी मी सच्चा शिवसैनिक असल्याचे सांगत भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे लगेच स्पष्ट केले.

या वेळी मान्यवरांनी शहा यांचे स्वागत केले. मात्र, खैरेंनी स्वागत केले नाही. त्यामुळे आमचे तुम्ही स्वागत केले नाही तरी चालेल; पण तुमचे आम्ही कधीही स्वागत करू. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे सेनेने सध्या सहकाराकडे लक्ष द्यावे, असे शहा म्हणाले. खैरे यांनीही, ‘मी येथे शेतकऱ्यांसाठी आलो आहे. पुढील काळात येथे उद्धव ठाकरे यांनाच घेऊन येईन’, असे म्हणत शहा यांना टोला लगावला.

भुमरे भाजपच्या वाटेवर?
‘संत एकनाथ’च्या गळीत हंगामाला भाजप अध्यक्षांना बोलावल्यामुळे कारखान्याचे चेअरमन व शिवसेना आमदार संदिपान भुमरे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. भाजपमध्ये कदापि जाणार नाही’, असे सांगत भुमरे यांनी या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.