आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात घटस्फोटित महिलांमध्ये 68% हिंदू, 23.3% मुस्लिम; बहुपत्नीत्वाच्या बाबतीत हिंदूच आघाडीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकची पद्धत अवैध ठरवल्यामुळे मुस्लिम समाजातील एक गट संतप्त झाला असताना घटस्फोट आणि बहुपत्नीत्वाच्या बाबतीत मुस्लिमांपेक्षा हिंदू नागरिक पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील एकूण घटस्फोटित महिलांमध्ये ६८ टक्के हिंदू, तर २३.३ टक्के मुस्लिम आहेत. देशात सर्वाधिक घटस्फोटित महिला महाराष्ट्रात आहेत, तर तब्बल ७९ टक्के मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या मालेगावात अवघे ०.१ टक्के नागरिक बहुपत्नी असणारे आहेत. 
 
ट्रिपल तलाकला सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील अभ्यासकांनी याबाबतची खरी स्थिती मांडण्यासाठी आकडेवारी जमा केली आहे. मुस्लिम अभ्यासक आणि ऑल महाराष्ट्र मुस्लिम तेली समाजाचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम बेग नदवी यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. यासाठी त्यांनी २०११ ची जनगणना आणि विविध रिपोर्ट्स तपासले. 
 
२०११च्या जनगणनेनुसार ८.५ लाख घटस्फोटित : देशात हिंदूंची लोकसंख्या ८० टक्के आहे. मुस्लिमांची १४.२३ टक्के, ख्रिश्चन २.३, शीख १.७२, बौद्ध ०.७२ टक्के, तर जैनांची संख्या ०.३७ टक्के आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण घटस्फोटितांचा संख्या ८.५ लाख आहे. यात एकूण घटस्फोटित महिलांमध्ये ६८ टक्के हिंदू, तर २३.३ टक्के मुस्लिम आहेत. एक हजारपैकी ५.५ हिंदू जोडप्यांनी कायदेशीररीत्या घटस्फोट घेतला आहे, तर १.८ जोडपे कायदेेशीररीत्या तलाक देताच विभक्त राहतात. अशा दोन्ही प्रकारचे घटस्फोटित मिळून देशात एक हजारामागे एकूण ७.३ हिंदू जोडपे विभक्त आहेत, तर मुस्लिमांचे एक हजार लोकसंख्येमागे घटस्फोटाचे प्रमाण ५.६३ एवढे आहे. याचाच अर्थ हिंदूचा घटस्फोटाचा दर मुस्लिमांपेक्षा अधिक आहे. 
 
ख्रिश्चन धर्मीयांत ४.१ टक्के : घटस्फोटित पुरुषांमध्ये हिंदूंचे प्रमाण ७६ टक्के, तर मुस्लिमांचे प्रमाण १२.७ टक्के आहे. ख्रिश्चनधर्मीयांमध्ये घटस्फोट घेणाऱ्या स्त्री-पुरुषांचे प्रमाण प्रत्येकी ४.१ टक्के आहे. घटस्फोटित महिलांमध्ये हिंदू स्त्रियांची संख्या ६८ टक्के, तर मुस्लिमांची संख्या २३.३ टक्के आहे. खरंतर घटस्फोटित स्त्री आणि पुरुषांची संख्या समान असायला हवी. परंतु पुरुष सहज दुसरा विवाह करतात. महिलांना मात्र हे सहज शक्य होत नाही. 
 
बहुपत्नीत्वातही हिंदूच आघाडीवर: मुस्लिमांना घटनेनेच बहुपत्नी करण्याची परवानगी बहाल केली आहे. परंतु कायदेशीर परवानगी नसतानाही हिंदूधर्मीय बहुपत्नीत्वाच्या बाबतीत मुस्लिमांच्या पुढे आहेत. यासाठी १९६१ ची जनगणना महत्त्वाची आहे. यात अखेरच्या वेळेस धर्म आणि जातीनुसार विवाहांची नोंद घेण्यात आली होती. यानुसार केवळ ५.७ टक्के मुस्लिमांनाच बहुपत्नी होत्या, तर बहुपत्नी असणारे हिंदू ५.८ टक्के होते. ७.९ टक्के बौद्ध, तर ६.७ टक्के जैन बहुपत्नी असणारे होते. आदिवासी समाजातील १५.२५ पुरुषांना एकापेक्षा अधिक पत्नी होत्या. घटनेच्या कलम २५ प्रमाणे शीख, जैन आणि बौद्ध हे हिंदू धर्माचे भाग होते. यामुळे तिन्ही धर्मीयांतील घटस्फोटितांची संख्या २०.४ टक्के होती. शीख धर्मीयांची वेगळी गणना झाली नसल्याने ती आकडेवारी उपलब्ध नाही. म्हणजेच मुस्लिमांपेक्षा हिंदू बहुपत्नी असणाऱ्यांची संख्या तब्बल चारपट अधिक आहे. 
 
एकटे पुरुष अधिक : २०११ च्या जनगणनेत आयुष्यभर अविवाहित राहणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या ३९ टक्के, तर पुरुषांची संख्या ५८ टक्के आहे. महिलांवर विवाह करण्याची घरच्यांची बळजबरी असते. त्यांना ती नाकारता येत नाही. पुरुष मात्र ती टाळण्यात यशस्वी होतात. 
 
ग्रामीण भागात जास्त घटस्फोट 
शहरी भागापेक्षा ग्रामीणमध्ये घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. शहरी भारतात ५.०३ लाख घटस्फोटित राहतात. देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक २.०९ लाख घटस्फोटित आहेत. पैकी ७३.५ टक्के म्हणजे १.५ लाख महिला आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक १.०३ लाख पुरुष घटस्फोटित आहेत. गुजरातच्या एकूण घटस्फोटितांच्या तुलनेत हे प्रमाण ५४ टक्के आहे. गोवा राज्य १३३० घटस्फोटांसह देशात सर्वात मागे आहे. 
 
मुस्लिम समाजात मात्र मोठी तफावत 
घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये हिंदूंची संख्या अधिक असली तरी घटस्फोटितांमधील स्त्री-पुरुषांमधील सर्वाधिक तफावत मुस्लिमधर्मीयांमध्ये आहे. मुस्लिम समाजात घटस्फोटितांच्या एकूण संख्येत ७९ टक्के महिला आहेत. हे प्रमाण ७९:२१ असे आहे. म्हणजेच एका मुस्लिम घटस्फोटित पुरुषामागे घटस्फोटित महिला आहेत. त्यापाठोपाठ बौद्धधर्मीयांमध्ये हे प्रमाण ७०:३०, तर ख्रिश्चन समाजात घटस्फोटित स्त्री-पुरुषाचे प्रमाण ६९:३१ आहे. 
बातम्या आणखी आहेत...