आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शस्त्रक्रियेसाठीची रक्कम लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सहा वर्षांच्या चिमुकलीला किडनीचा (मूत्रपिंड) आजार जडला. पै-पै साठवून शस्त्रक्रियेसाठी ३३ हजार रुपये जमवले. शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेतल्याने पिता हवालदिल झाला आहे. सोमवारी पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे. पोलिस आता फसवणूक करणा-याचा शोध घेत आहेत.

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन जवळील राजामाता जिजाऊनगर येथील संतोष रामचंद्र मुंधरे यांची सहा वर्षांची मुलगी श्रुती हिची डावी किडनी खराब झाली. डॉक्टरांनी उपचारांचा खर्च एक लाखाच्या जवळपास सांगितला. त्याप्रमाणे मुंधरे यांनी पै-पै गोळा केली. गरजेनुसार पैसे काढू, असे ठरवून त्यांनी जमवलेली रक्कम सिडको एन-१ भागातील काॅर्पोरेशन बँकेत जमा केली. १२ जानेवारी रोजी श्रुतीला टीव्ही सेंटरच्या एम्स हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची डावी किडनी काढण्यात आली. त्यानंतर हॉस्पिटलचा खर्च देण्याची वेळ आली तेव्हा खात्यातून ३३ हजार ३९६ रुपये वर्ग झाल्याचे समोर आले. आॅनलाइन पैसे काढण्यात आल्याचे बँकेच्या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट झाले. या प्रकरणाची बँकेनेही जबाबदारी झटकली. २९ जानेवारी रोजी केवळ १२ मिनिटांत पाच टप्प्यांत हे पैसे काढले गेले. त्यांच्या खात्यावर ४० हजार रुपये होते. त्यापैकी ३३ हजार ३९६ रुपये वळते झाल्यानंतर बँक अधिका-यांनी शिल्लक रक्कम काढून घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी सहा हजार काढून घेतले असून आता ५७१ रुपये खात्यावर शिल्लक आहेत.

अशी झाली फसवणूक
गुरुवारी (२९ जानेवारी) दुपारी भामट्यांनी २ वाजून ४८ मिनिटांनी प्रथम दीड हजार रुपये काढले. त्यानंतर प्रत्येकी दोन मिनिटांनी पैसे काढण्याचा सपाटा लावला. दुस-या वेळी १ हजार ९९६ रुपये, तिस-यांदा १९ हजार ९०० रुपये व त्यानंतर दोन वेळा पाच - पाच हजार रुपये काढले.

नेट बँकिंगद्वारे पैसे काढले
मी माझा खाते क्रमांक किंवा एटीएम पासवर्ड अद्यापपर्यंत कुणाला सांगितला नाही, तरीही माझ्या खात्यावरून पैसे काढले गेले. बँक कुठलीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. माझ्या पैशांची भरपाई कोण करून देईल?
संतोष मुंधरे, तक्रारदार