आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश खरेदीची पावती दाखवल्यानंतरच जमा होणार विद्यार्थ्याच्या खात्यावर रक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज- पूर्वी शासनाच्या वतीने सामाजिक व आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जात होते. परंतु यावर्षीपासून गणवेशाऐवजी थेट ठरावीक रक्कम विद्यार्थी पालक अर्थात केवळ आई या दोघांच्या नावे संयुक्त बँक खाते उघडावे व त्यात गणवेश घेतल्यानंतर शाळेत पावती दाखवली त्यानंतर खात्यात दोन गणवेशासाठी ४०० रुपये जमा होणार अशी ही योजना आहे. परंतु हे खाते झीरो बॅलन्सवर उघडण्यास बँका कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनुत्सुक असल्याचा आरोप पालकांमधून होत आहे. आतापर्यंत फुलंब्री तालुक्यातील ९७८८ लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी केवळ १३९२ जणांनी खाते खोलले असून अद्याप ८३९६ जणांचे खाते उघडणे बाकी आहे.      

यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शालेय गणवेश वाटप केले जात होते. परंतु या प्रक्रियेला चालू शैक्षणिक वर्षापासून फाटा देण्यात आला आहे. दोन गणवेशाचे ४०० रुपये मायलेकांच्या संयुक्त खात्यात जमा होणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीकडून पूर्वी गणवेश वाटपात गैरप्रकार होत असल्याची ओरड होती. याबाबत तक्रारी ही वाढल्या होत्या. यामुळे शासनाने गणवेश वाटपातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी थेट रक्कम बँक खात्यात जमा हा अनोखा उपक्रम हाती घेतला. 

जिल्हा परिषद शाळेमधील अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय मुले व सर्व गटातील मुली यांना मोफत गणवेश देण्यात येतो. प्रती विद्यार्थ्यांना एक गणवेश २०० रुपये प्रमाणे दोन गणवेशाचे ४०० रुपये खात्यात जमा होणार आहे. एकही पात्र विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु ही योजना जरी चांगली असली तरी सर्व पालक एकाच प्रकारचे गणवेश घेतील का अशी शंका शिक्षक वर्गातून बोलल्या जात आहे. पालक वेगवेगळ्या दुकानातून गणवेश खरेदी करतील यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश सारखे राहणार नाही. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विविध कल्याण कारी योजना राबविल्या जातात. यामध्ये मोफत पाठ्यपुस्तक, सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजना,राजीव गांधी अपघात विमा योजना, मोफत गणवेश आदी योजना कार्यान्वित आहे. 

या मध्ये राजीव गांधी अपघात योजना व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना वगळता अन्य योजनेत विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात लाभ दिला जातो. आता वस्तू स्वरूपात लाभ न देता थेट बँकेत ह्या रक्कमा जमा करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी झीरो बॅलन्सवर खाते खोलण्याचे बँकांना शासनाचे आदेश आहे. परंतू बँकेत देखील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे हे झीरो बॅलन्स खाते खोलण्यास अडचणी येत असल्याची पालकांची ओरड आहे. 

चारशे रुपयांत दोन गणवेश कसे घेणार?
पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ४०० रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे. पाचवीपर्यंतच्या मुलाचा एक गणवेशदेखील होत नाही. त्यात दोन कसे होणार अन् पाचवी ते आठवीच्या मुलांचे तर गणवेश एवढ्या पैशात होणे शक्यच नाही.

प्रथम खरेदी, नंतर खात्यात पैसे 
नवीन नियमात प्रथम गणवेश खरेदी करावा त्याची पावती शाळेत दाखवल्यानंतर खात्यात पैसे जमा होेतील. परंतु, आधी गणवेशासाठी पैसे कोठून आणायचे असा सवाल पालकांमधून होत आहे.   

पैसेच नाहीत; गणवेश आणावा कोठून
शासन आम्हाला गरीब आहे म्हणून गणवेश मोफत देते ही गोष्ट चांगली आहे. परंतु अधी गणवेश घ्यावा नंतर पैसे मिळतील येथे पैसेच नाही तर गणवेश आणावा कोठून असा सवाल आहे. तर पहिलीच्या मुलांना दोन गणवेशासाठी ४०० रुपये व आठवीच्या मुलाला ही ४०० रुपये या तुटपुंज्या रक्कमेत पहिलीच्या मुलांना दोन गणवेश बसणार नाही मग आठवीच्या मुलांना कसा घ्यावाे.   
- रेखा राजेंद्र थोरात, पालक
 
बँकेत प्रतिसाद मिळत नाही, पहिली योजनाच बरी होती
शिक्षण विभागाने जूनमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करावयास निघाले की काय असा प्रश्न पडला आहे. शिक्षकांनी अनेक ऑनलाइन कामे लावून दिली आहेत. त्यात आता ही संयुक्त खाते खोलण्याचे काम शिक्षक व मुख्यध्यापक यांच्यावर सोपवली आहे. बँकेत प्रतिसाद मिळत नाही. यापेक्षा पहिलीच योजना बरी होती. 
-  दिलीप ढाकणे, जिल्हा अध्यक्ष शिक्षक समिती  
 
फुलंब्री तालुक्यात एकूण लाभार्थी ९७८८असून यापैकी १३९२ विद्यार्थ्यांचे आई व पाल्य यांचे संयुक्त खाते खोललेली आहेत. ८३९६ मुलांचे संयुक्त खाते खोलणे बाकी आहे. 
- रवींद्र वाणी, गटशिक्षणाधिकारी

बँकेशी चर्चा करणार 
२०० रुपये एक गणवेश प्रमाणे एका लाभार्थ्यांना ४०० रूपयेच मिळणार आहे. हा शासन निर्णय आहे. यात मी काहीच करू शकत नाही. खाते खोलण्यासाठी बँकेशी चर्चा करणार आहे. 
- एम.के.देशमुख, शिक्षण अधिकारी जि. प.
 
बातम्या आणखी आहेत...