आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाष्य: भ्रष्ट युती तोडण्याची हिंमत या जोडगोळीत आहे का? (श्रीकांत सराफ)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद शहरात मोठा भाऊ होण्याची आणखी एक संधी भाजपने गमावली. मनपा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आपण स्वतंत्र लढणार, तुम्ही तयारीला लागा, असे सांगणारे नेते अचानकपणे लोकांची युतीची इच्छा आहे. त्यापुढे झुकावेच लागले, असे म्हणू लागले. त्यांनी कार्यकर्त्यांची कोंडी करून टाकली. खरे तर समांतर जलवाहिनीच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर तोफ डागण्याची, त्यातील गैरव्यवहार उघड करण्याची आणि औरंगाबादकरांना सत्य सांगण्याची जबाबदारी भाजपने स्वीकारायला हवी होती.
संरक्षणाच्या नावाखाली काही जणांचे उखळ पांढरे करून घेणाऱ्या सेनेला लोक कंटाळले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी हा समर्थ पर्याय नव्हता. त्यातच सेनेकडून एमआयएमचा बागुलबुवा दाखवण्यात आला. त्या भीतीतून मते गोळा करण्यात आली. त्यानंतर महापौराच्या रस्सीखेचीत तरी भाजप पुढे राहील, अशी अपेक्षा होती. तीदेखील फोल ठरली. मात्र, मुंबई मनपातील राजकीय गणिते लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसला अपेक्षित असलेला कोणताही चमत्कार झाला नाही. सेनेचे तुपे, भाजपचे राठोड महापालिकेचे नवे कारभारी झाले. त्यांच्या रूपाने दोन तरुण नेते शहराला मिळाले, असे चित्र सध्या तरी आहे. भ्रष्टाचारामुळे अडकलेली जलवाहिनी, खड्ड्यात गेलेली रस्ते, जागोजागी झालेली अतिक्रमणे अशी अनेक अाव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यावर ते दीड वर्षात कशी मात करतील, हे औरंगाबादकरांना पाहण्यास मिळणार आहे. युतीकडे बहुमत, राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यामुळे मात करण्याची ही वाट अधिक सोपी असेल, असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा ठरू शकतो. कारण जेवढे सत्ता मिळवणे सोपे तेवढे ते टिकवणे अधिक अवघड असते. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर कसदार, बाणेदार नेतृत्व लागते.

दुर्दैवाने ते दोन्ही पक्षांकडे दिसत नाही. आधी विकास जैन यांना महापौरपदासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी पसंती दिली होती. मात्र, खासदार चंद्रकांत खैरे गटाकडून त्यांना विरोध सुरू होताच खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या पदावर राखीव वर्गातील नगरसेवक कशासाठी, असे पिल्लू सोडून देण्यात आले. त्यामुळे जैन यांच्यासह नंदकुमार घोडेलेंचाही पत्ता कटला. मितभाषी तुपेंच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. त्याचे श्रेय आता खैरे घेण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. समांतरवर पांघरूण टाकण्यासाठी शक्ती पणाला लावतील. त्यातच कदम लवकरच सिंधुदुर्गचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर तुपेंना काम करणे कठीण जाणार आहे. शिवसेेनेतील ठेकेदारीच्या गोतावळ्याकडून दर्जेदार कामे करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. दुसरीकडे राठोड यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पाठिंबा असला तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अंतर्गत विरोध आहे. बाहेरून आलेला कुणीच मोठा होता कामा नये, असा त्यांचा पवित्रा आहे. त्यामुळे शहराध्यक्ष भगवान घडामोडे, डॉ. भागवत कराड आदींना एकीकडे सांभाळत दुसऱ्या बाजूने आक्रमक शिवसेनेलाही त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. हे सर्व करत असताना तुपे, राठोड यांना राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांना गती द्यायची आहे. महापालिकेतील अनेक अधिकारी नगरसेवकांशी हातमिळवणी करून केवळ स्वत:च्या कमाईसाठीच काम करतात, कामांची वाट लावतात, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शहराचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी ही भ्रष्ट युती तोडण्याची हिंमत या जोडगोळीत आहे काय?
बातम्या आणखी आहेत...