आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोलावरी डी’ पेक्षा जास्त गाजले गाणे; या मराठी गायकाच्या कॅसेट विक्रीची नोंद गिनीज बुकात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाची वरात असो की शुभकार्य यांचे गाणे हवेच..लोकसंगीत आणि द्विअर्थ शब्दांचा बाज असणारी गाणी.. आधुनिक संचार साधने नसतानाही ‘कोलावरी डी’ पेक्षा जास्त गाजलेले गाणे..10 हजारांहून जास्त गाणी आणि 250 चित्रपटांत पार्श्वगायन. उभ्या महाराष्ट्राला आपल्या शब्दांचे आणि संगीताचे वेड लावणारे नाव म्हणजे आनंद प्रल्हाद शिंदे.सामान्य व्यक्ती ते प्रसिद्ध गायक-संगीतकार असा हर्ष आणि उत्कर्षाच्या आदर्श प्रवासात साथ मिळाली ती पत्नी विजया यांची..

प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवला आहे. वडिलांसोबत कोरसमध्ये जाणारा मुलगा ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज या 40 वर्षांचा थक्क करणारा संगीतमय प्रवास. हालअपेष्टा, चांगले-वाईट अनुभव पचवत पर्शिमाच्या जोरावर त्यांनी स्वत:चा चाहता वर्ग तयार केला. मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडपर्यंत त्यांच्या गाण्याची धूम राहिली आहे. त्यांच्या या प्रवासात पत्नी विजया यांचा देखील मोलाचा वाटा आहे. काही नसताना आणि सर्व काही असताना देखील विजया यांनी आनंद यांना प्रोत्साहन दिले.

कलेचा वारसा

आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक, तर आजी सोनाबाई तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील संगीत क्षेत्राची सेवा केली.

शाळेपेक्षा गायनाची आवड

आनंद मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढय़ाचे, पण लहानाचे मोठे झाले ते मुंबईमध्ये. लहानपणापासून ते वडिलांसोबत कोरसमध्ये गाणी म्हणायला जायचे. कव्वालीचे मुकाबले त्यांना फार आवडायचे. शाळेत मात्र त्यांचे मन फारशे रमले नाही. शाळेत शिकण्यापेक्षा गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला त्यांना आवडायचे. नववीत नापास झाल्यावर शाळा थांबली आणि हातात तबला आला. वडिलांचा मार, बोलणे खात तबला शिकले. कव्वालीच्या मुकाबल्यात आनंद आणि मिलिंद हे भाऊ ढोल वाजवायचे, वडिलांच्या गैरहजेरीत तेच कार्यक्रम करत होते.

आनंद-विजयाची लगीनगाठ

विजयादेखील मंगळवेढय़ाच्याच. 1982 मध्ये सातवीत शिकत असतानाच त्यांचे आनंद यांच्यासोबत लग्न झाले. लग्नावेळी दोघांचेही वय लहान होते. शेजारी राहत असल्यामुळे विजया-आनंद यांच्या आजी मुक्ताबाई यांच्या आवडीच्या होत्या. विजयालाच घरची सून बनवायची, असे आजीचे मत होते. लग्नानंतर आनंद आणि विजया यांनी एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेत एकमेकांना मदत केली. संगीताविषयी असणारे प्रेम विजया यांना ज्ञात असल्याने त्यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले. आनंद आजही प्रत्येक गाणे विजया यांच्याकडून क्रॉसचेक करून घेतात. त्यांचा होकार मिळाल्यावरच ते गाणे लिहिले जाते. कार्यक्रम सुरू करण्याआधी विजयांना फोन करतात. त्यांनी शुभेच्छा दिल्यावरच ते गायनाला सुरुवात करतात.

विजयाच्या रुपात लक्ष्मी आली..

लग्नावेळी आनंद यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्यामुळे लग्नात विजया यांना नकली मंगळसूत्र दिले होते. पण ही परिस्थिती बदलायचीच असा त्यांचा दृढनिश्चय होता. जिद्द आणि पर्शिमाच्या बळावत त्यांनी आर्थिक संपन्नता आणली. आर्थिक सुबत्ता जशी आली तशी त्यांनी विजया यांना सोन्याच्या अनेक वस्तू भेट दिल्या. नखशिखांत सोन्याने मडवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. पायातदेखील सोन्याची जोडवी घालण्यास दिली. यावर आनंद यांचे नातेवाइकांनी सौभाग्यवती बाईने पायात सोने घालू नये. लक्ष्मी जाते, पतीलाही धोका असतो, असा सल्ला दिला. मात्र आनंद यांनी विजया हीच माझी लक्ष्मी आहे. तिच्या रूपातच माझ्या घरी लक्ष्मी आली आहे, असे उत्तर दिले.

तिन्ही मुले उच्चशिक्षित

आनंद आणि विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. हर्षद अ‍ॅनिमेशन इंजिनिअर असून उत्कर्ष डॉक्टर (एमडी) आहे. सर्वात धाकटा असलेला आदर्श संगीत परंपरेचा वारसा पुढे घेऊन जावा, अशी शिंदे यांची अपेक्षा आहे. तिघाही मुलांना गायनाची आवड आहे. उत्कर्षने ‘पावर’ चित्रपटाला संगीत दिले. त्याचप्रमाणे उत्कर्ष आणि आदर्शने मिळून गौरव महाराष्ट्राचा, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे थीम साँग तयार केले. शिंदे कुटुंबाचे नाव मुलांनी आणखी उज्‍जवल करावे, अशी या दांपत्याची आशा आहे. समाजाने खूप काही दिले त्याची परतफेड करण्याच्या उद्देशाने आनंद यांनी उत्कर्षला डॉक्टर बनवले. ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोफत सेवा केली जाते.

पुढील स्लाइडमध्ये, पोपटाच्या जन्माची कथा..