Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Ancient Indian Womens Are Powerful

'वैदिक काळातील स्त्रिया होत्या पुरुषांपेक्षा अधिक ज्ञानी'

प्रतिनिधी | Feb 22, 2013, 09:13 AM IST

  • 'वैदिक काळातील स्त्रिया होत्या पुरुषांपेक्षा अधिक ज्ञानी'

औरंगाबाद - वैदिक काळात स्त्रिया या पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक ज्ञानी, सक्षम आणि बलशाली होत्या. वैदिक काळातील स्त्रियांनी अधिराज्य गाजवले आहे. मैत्रेयी, गार्गी, सूर्या आणि जबालासारख्या अनेक महिलांनी असाधारण कौशल्याचे सादरीकरण केले आहे, असे मत प्रा. मंजूषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

स्फूर्ती महिला मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा वीणा क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, वैदिक काळात स्त्रियांनी विचार , कर्तृत्व आणि ज्ञानाने स्वत:ला सिद्ध केले होते. त्याकाळी महिलांना आपला पती निवडण्याचे अधिकार होते. अनेक प्रकारचे स्वातंत्र्य महिलांना होते. आजच्या प्रमाणेच महिलांनी तेव्हाही स्वत:ला उत्तमरीत्या सिद्ध केले होते. त्या खर्‍या अर्थाने स्वतंत्र होत्या. सत्तेची समीकरणेही त्यांच्याच हाती होती. आज या स्त्रियांच्या कार्याला उजाळा देऊन आपणही त्याच वाटेने जाऊन आपला मानसन्मान, संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे, असे प्रोत्साहनही त्यांनी महिलांना दिले.

या सर्व स्त्रियांचे जीवनचरित्र आपण वाचायला हवे. आपल्याला सर्वांना संस्कृत वाचता येत नाही, मात्र यातील काही पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत, ते आवर्जून वाचायला हवे. त्यातच आपला स्त्रीजन्म सार्थक होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

यानंतर मंडळाच्या विविध गटांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये सोनचाफा गटाच्या सदस्यांनी कवयित्री शांता शेळके यांच्या निवडक मात्र, संस्मरणीय कवितांचे सादरीकरण केले. मोगरा गटाच्या वतीने वीणा क्षीरसागर यांनी सांस्कृतिक प्रस्तुती केली. गुलाब गटातर्फे कमल बावीस्कर, कालिंदी कोरड, विमल तळेकर यांनी भारुडाचे सादरीकरण के ले. रातराणी गटातर्फे आरती कुलकर्णी, ज्योत्स्ना राऊत आणि वीणा म्हैसेकर यांनी ‘कन्या कु णाची’ हे नाट्य सादर केले. गुलबकावलीच्या वीभा श्रीवास्तव यांनी ‘नयना लागाय रे’ या गीतावर सवेशभूषा अप्रतिम नृत्य केले. कमल गटाच्या अलका अमृतकर यांनी महाराष्ट्राची थोरवी सर्वांपुढे मांडली. तर महाराष्ट्राची शान आणि मुख्य लोककला म्हणून ओळख असलेली खुमासदार लावणी सादर केली. ‘रेशमाच्या रेघांनी ’ या लावणीच्या अप्रतिम सादरीकरणात रौप्यमहोत्सवी सोहळा रंगून निघाला.

Next Article

Recommended