आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडीतील पोषण आहारात आढळले केस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
सोयगाव - तालुक्यातील गलवाडा (अ) अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत महिलांच्या डोक्यावरील केस आढळल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यासंदर्भात पालकांनी थेट एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय गाठून प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रार दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला आहे.
गलवाडा (अ) येथील अंगणवाडी क्रमांक ८६ मध्ये गावपरिसरात राहणारी ३५ बालके ज्ञानार्जनासाठी दररोज येतात. नेहमीप्रमाणे बालक कृष्ण इंगळे हा शुक्रवारी अंगणवाडीत ज्ञानार्जनासाठी आला होता. त्यास इतर विद्यार्थ्यांप्रमाणे घरी जाण्याच्या वेळी खिचडी देण्यात आली. परंतु त्या खिचडीत महिलांच्या डोक्यावरील केस आढळून आले . त्यामुळे कृष्णाचे वडील ज्ञानेश्वर इंगळे यांनी थेट प्रकल्प अधिकारी डब्ल्यू. ए. तायडे यांची भेट घेऊन तक्रार दिली. तसेच अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांनी माझ्या मुलाला दिलेल्या खिचडीत केस आढळल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या दोघींच्या निष्काळजीपणामुळे अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. त्यासाठी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

लगेच तक्रारीवरून प्रकल्प अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षिका पी.एम. बडोदे यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार बडोदे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. यात अंगणवाडीत खिचडी तपासली असता त्यात कुठेही डोक्यावरील केस किंवा घाण आढळून आली नाही, असे नमूद केले. त्यावर गावातील गणेश देशमुख, रवींद्र इंगळे, जगदीश बिऱ्हारे, अमोल दाभाडे, अशोक कांबळे, गुलाबराव देशमुख, दीपक सुरडकर, अजय कांबळे, सुनील खिरडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी श्री सप्तशृंगी बचत गटाच्या गोजराबाई मडवे यांना अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा सुधारावा, अशा लेखी सूचना दिल्या आहेत.

तांदळाचा कट्टा घेऊन जाणाऱ्या शिक्षकास पकडले
चिंचोली - चिंचोली येथील मथुरामाता माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकाला चक्क शालेय पोषण आहारातील तांदळाचा कट्टा घेऊन जाताना पकडले. या मथुरामाता विद्यालयाचा एक शिक्षक दुकाचाकीवरून तांदळाचा कट्टा घेऊन जात असल्याची माहिती शाळेचे संचालक जयवंत पवार, सीताराम पवार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी संबंधित शिक्षकास चिंचोली-सिल्लोड रोडवर बरकतपूर-वाकद फाट्यावर गाठले. या वेळी त्याला विचारणा केली असता तांदूळ घरी घेऊन जात असल्याची माहिती मुख्याध्यापकांना दिली असल्याचे त्याने सांगितले. याबाबत पिशोर पोलिस ठाण्यात कळवल्याचे संचालक पवार यांचे म्हणणे आहे. याबाबत माहिती विचारण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल होता. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही कारवाही न झाल्याचे संचालक पवार यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...