आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेद्वारे व्यवहारांमुळे अर्थव्यवस्थेत बदल शक्य - अनिल बोकील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आयात कर सोडला तर देशातील सर्व कर रद्द करून बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार केल्यास अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल करता येणे शक्य असल्याचे मत अर्थक्रांतीचे प्रमुख अनिल बोकील यांनी व्यक्त केले.

भाजपच्या व्यापारी आघाडीतर्फे रविवारी संत एकनाथ रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोकील बोलत होते. बोकील गेल्या अनेक वर्षांपासून कररचनेतील बदलांबाबत मार्गदर्शन करत आहेत. ते म्हणाले, अर्थविषयक विचार सर्वांना पटतात मात्र राजकीय पक्षांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अशी परिस्थिती राजकीय पक्षांची आहे. व्यापार्‍यांनी आपण दलाल नसून वितरक आहोत हे विसरून गेल्यामुळेच त्यांना सन्मान मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी भाजपचे एकनाथ जाधव, बापू घडामोडे, अतुल सावे, राजेश मेहता उपस्थित होते. शोभा डांगे यांनी सूत्रसंचालन केले.

केवळ निवडणुकीसाठी काळ्या पैशाची निर्मिती
या कार्यक्रमात बोकील म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेत केवळ निवडणुकीसाठी काळ्या पैशाची निर्मिती केली जाते. त्यामुळे भ्रष्ट राज्यकर्ते, नोकरशहा आणि उद्योजक यांच्या माध्यमातून हा पैसा उभा केला जातो. आपल्याकडे बँकेत पैसे ठेवल्यानंतर व्याज मिळते. तर स्विस बॅँकेत पैसे ठेवण्यासाठी व्याज द्यावे लागते. त्यामुळे देशातील सर्व कर रद्द करून तसेच 50 रुपयांच्या वरच्या नोटा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. बँकेच्या व्यवहारावर कर लावल्यास सर्व अर्थव्यवस्था बदलून जाईल. त्यामुळे कररचनेत सुधारणा करून केवळ बँकेतील प्रत्येक व्यवहारावर दोन टक्के कर लावला तर त्यामधून केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्थाना कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल. तसेच व्यवहारातून बँकांना वाटा दिल्यास बँकेचे उत्पन्न वाढल्यामुळे व्याजदर दोन टक्क्याच्या खाली येतील.