आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Gote News In Marathi, Gopinath Munde, BJP, Dhule, Loksangram Party

गोपीनाथ मुंडे कपटी मित्र, अनिल गोटे यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याशी पस्तीस वर्षांपासून मैत्री असून, लोकसभेसाठी त्यांनी आपणास धुळे मतदारसंघातून उमेदवारी देण्यासंबंधी सांगितले होते. मात्र, ऐनवेळी पत्ता कट केला. यातून कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असेच म्हणण्याची वेळ आल्याचे लोकसंग्राम पक्षाचे नेते आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी (25 मार्च) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


राज्यात नऊ टक्के धनगर समाज असून तो सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. लोकसंग्राम पक्षानेही महायुतीला पाठिंबा दिलेला होता. प्रारंभी आपण महायुतीच्या सभांनाही उपस्थित होतो. गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासोबत बैठकांनाही सहभागी होतो, असे गोटे यांनी सांगितले. मुंडेंनी धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे स्वत: बोलावून सांगितले; परंतु नंतर शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष भांबरेंना ऐनवेळी उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने नोटाचा वापर करावा, असे आवाहन राज्यभर करणार असल्याचे आ. गोटे यांनी जाहीर केले.


भाजपने सांगली मतदारसंघातून आमदार प्रकाश शेंडगेंना डावलून राष्ट्रवादीचे संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली. नगरमध्ये आ. राम शिंदे यांना डावलून खा. दिलीप गांधी यांनाच उमेदवारी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना माढय़ामधून उमेदवारी देण्याऐवजी त्यांना बारामतीतून उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवले.
राज्यात चौदा लोकसभा मतदारसंघांत धनगर समाजाचे चाळीस लाख मतदान असून, मतदारसंघनिहाय बैठका घेऊन नोटाचा वापर करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दिलीप अग्रहारकर, सुरेश शिंदे, तेजस गोटे, अनिल जवादे, दिलीप देशमुख, जगन रिठे यांची उपस्थिती होती.