आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळा: उन्हाच्या काहिलीने नाग, अजगरासह पक्ष्यांच्या कृत्रिम पाणवठ्यावर उड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंशांवर जाताच शहरासह जंगलातील पशुपक्ष्यांची प्रचंड उकाड्याने काहिली होत आहे. गौताळा अभयारण्यातील पाणवठे आटल्याने आता सरपटणाऱ्या प्राण्यांनी कृत्रिम तलावांचा आधार घेतला आहे. साप, नाग, अजगर या ठिकाणी पोहत असतात. उंचावरून गरुडाची चाहूल लागताच सरपटणारे जीव जवळच्या झाडीत गायब होतात. गरुड आणि सापांचा हा लपंडाव सध्या गौताळ्यात पाहावयास मिळत आहे. 

रविवारी सकाळी रणरणत्या उन्हात गौताळ्यात वन्यजीव भयंकर उकाड्याने त्रस्त असल्याचे दिसले. भरदुपारच्या उन्हात आठ नीलगाईंचा कळप पाणी पिताना दिसला. मात्र, पावलांची चाहूल लागताच ते क्षणार्धात गायब झाले. एका कृत्रिम पाणवठ्यावर सापाची तीन छोटी पिल्ले, दोन नाग आणि अजगराचे चार ते पाच महिन्यांचे पिलू उन्हापासून बचाव करण्यासाठी उथळ पाणवठ्यात पोहत होती. आकाशातून अचानक मत्स्यगरुडाची स्वारी आली. गरुड झाडावर बसले. तोपर्यंत पाण्यातील साप, नागाने झाडीत आश्रय घेतला. गरुड कृत्रिम पाणवठ्यावर बराच वेळ बसले. अंदाजे दहा किलो वजनाचा आणि किमान एक मीटरभर लांब आकाराचे पंख असलेला मत्स्यगरुड पाणी पिऊन थोडा वेळ गारव्याशी बसला. 

रानफुलं खाऊन जगताहेत पक्षी 
संपूर्णजंगल शुष्क आणि कोरडे पडले आहे. झाडांवर फळे, पक्ष्यांसाठी अन्न नाही. पिवळा काटेसावर, मोहाच्या झाडाला लागलेली पिवळी गोड फुले, करवंद, लोखंड नावाच्या झाडाला लागणारी गोडआंबट फळे खाऊन पक्षी जिवंत आहेत. गरुड, घार दिवसभर सापांच्या शोधात असतात. पाणथळीला त्यांना एखादा साप मिळतोच. पक्ष्यांना मात्र झाडांवर भ्रमंती करत फळे शोधावी लागत आहेत. माकडांनादेखील अन्न मिळवण्यासाठी खूप भटकंती करावी लागत आहे. झाडावरचा डिंक खाऊन माकडे आपली भूक भागवतात. 
 
पुढील स्लाइडवर पाहा पाणी पिण्यासाठी आलेले गरूड आणि साप...
बातम्या आणखी आहेत...