आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळ्यातील प्राणी, पक्षी देताहेत ‘मान्सून कमिंग सून’ची वर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौताळ्यात जागोजागी असे खळगे आढळतात. पावसाळ्यास सुरुवात होण्यापूर्वी कीटक यात भक्ष्य गाडून ठेवतात. - Divya Marathi
गौताळ्यात जागोजागी असे खळगे आढळतात. पावसाळ्यास सुरुवात होण्यापूर्वी कीटक यात भक्ष्य गाडून ठेवतात.
औरंगाबाद- वरुणराजाच्या आगमनाची चाहूल मानवांपेक्षा प्राण्यांना लवकर लागते. याचा प्रत्यय गौताळा अभयारण्यात आला. दोन दिवसांपासून या भागात गार वारे सुटले असून त्यामुळे मोर नाचत आहेत तर नीलयागी सैरावैरा धावत आहेत. ठिकठिकाणी मुंग्यांची मोठी रांग लागली असून त्या पावसाळ्यासाठी अन्नाचा साठा करून ठेवत असल्याचे वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले. 

माहूरनंतर सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौताळ्यातील प्राण्यांनी गत तीन वर्षे भीषण जलसंकटाचा सामना केला. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे या प्राण्यांनाही त्याची झळ बसली. जूनच्या मध्यावर हजेरी लावणाऱ्या पावसाची वर्दी हे प्राणी वेळोवेळी देत होते. यंदा या प्राण्यांना नेहमीपेक्षा खूप लवकर पावसाची चाहूल लागली असून त्यांच्या दिनचर्येतील बदलांतून वरुणराजाच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. मोर आतापासून नृत्य करत आहेत तर नीलयागी, हरिण हे आनंदाने उड्या मारत अाहेत. घनदाट जंगलात मुंग्यांसह सर्वच कीटकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. हे सर्व कीटक खाद्यासाठा काम करत असल्याचे वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले. उंट नावाचा कीडा भक्ष्य जमिनीत गाडून ठेवत आहे. त्याचे खळगे जंगलात जागोजागी दिसतात. 

हालचालींतून मिळताहेत संकेत 
मुंग्या, मुंगळे, अन्य कीटक आणि प्राण्यांना मान्सूनच्या आगमनाची चाहूल सर्वप्रथम लागते. त्यांच्या हालचालींतून वरुणराजाच्या आगमनाचे संकेत मिळतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंग्या वारुळात खाद्य जमा करून ठेवतात. कीटकही अशीच तयारी करतात. यावरून यंदा लवकर पाऊस येईल, अशी वर्दी मिळते.
- बाळासाहेब जराड, वन्यजीव अधिकारी, गौताळा 

तापमान अंशांनी कमी 
पावसाचीचाहूल लागल्याने खाद्य जमवण्यासाठी आठ दिवसांपासून प्राण्यांची ही दिनचर्या सुरू आहे. या जंगलात खोल खाई असून तेथील दृश्य उन्हाळ्यातही विहंगम दिसते. या खाईतून गार वारे वाहत असल्याने गौताळ्याचे तापमान अंशांनी कमी झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...