आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णांचा राजकारण प्रवेश - राजकीय पुढार्‍यांनी मात्र उडवली खिल्ली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नवीन पक्ष स्थापन करण्याच्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या घोषणेचे व्यापारी, उद्योजक आणि अभ्यासकांनी स्वागत केले आहे. मात्र शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस आघाडीने खिल्ली उडवली. भारतात चांगल्या गोष्टी होऊ दिल्या जात नाहीत. त्यामुळे अण्णांचा पक्ष मजबुतीने उभा राहू दिला जाणार नाही, अशी भीती काही जणांनी व्यक्त केली. राजकीय मोर्चेबांधणीत हा पक्ष यशस्वी होणे अशक्य नाही; पण त्यांचा मार्ग कठीण असल्याचा सूरही व्यक्त झाला.
अण्णांना राजकीय मार्गाने जायचे होते तर त्यांनी इतके दिवस ताकाचे गाडगे का लपवले, असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे, तर पुण्यात निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या निवडणुकीत अण्णांना पराभवाचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नसल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ कोकाटे यांनी म्हटले आहे.
अण्णांनी पक्ष स्थापण्यास विलंब केला. याच मार्गाने जायचे होते तर त्यांनी उपोषण करण्याची गरज नव्हती. तेव्हाच पक्ष स्थापन करून लोकशाही मार्गाने जायला हवे होते. आता त्यांना ती संधी मिळेल. किती जनाधार आहे, हे मतपेटीतून समजू शकेल. समीर राजूरकर, नगरसेवक, शहर प्रगती आघाडी
देशात आणखी एका राजकीय पक्षाची भर पडेल. अण्णांच्या मागे खरेच किती जण आहे हे एकदाचे स्पष्ट होईलच. इतके दिवस अण्णांनी उगीच वेगळ्या गप्पा ठोकल्या; पण त्यांच्या हातात ताकाचे गाडगे होते हे आता स्पष्ट झाले. ताकाला निघाले असताना गाडगे लपवून ठेवायला नको होते. पक्ष उभारणे आणि चालवणे किती सोपे असते हे त्यांना आता कळेलच. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
अण्णांना आतापर्यंत तटस्थ आणि अराजकीय व्यक्तींचा पाठिंबा होता. तोही आता राहणार नाही. पक्ष चालवणे किती कठीण असते, याचा प्रत्यय त्यांना येईल. मतदार एका दिवसात पाठीशी येत नाहीत, हेही उमगेल. पक्षातील मंडळींचा स्वार्थ कसा सांभाळावा लागतो, हेही त्यांच्या लक्षात येईल. डॉ. भागवत कराड, माजी महापौर.
अण्णांना आतापर्यंत असलेली संघ परिवाराची सहानुभूतीही गमावावी लागेल. त्यामुळे एकट्यालाच लढावे लागेल. अविनाश धर्माधिकारी यांच्या पुण्याच्या निवडणुकीत अण्णा पाठीशी होते. त्यांना एक अनुभव आहेच. जनांदोलन आणि राजकीय आंदोलन यातील फरक त्यांना कळेलच. काशीनाथ कोकाटे, ज्येष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादी
अण्णांचे हे पाऊल अपेक्षित असेच आहे. त्यांच्या चळवळीची दिशाच तसे संकेत देत होती. आता त्यांचा हेतू स्पष्ट झाला. परंपरा असलेले पक्ष सत्ता मिळवताना घायाळ होतात. अण्णा म्हणतील तेच त्या पक्षात असेल. म्हणजेच हुकूमशाही आली. आपल्या देशात ती चालू शकत नाही. मैदानावर भाषण करून उपदेश देणे सोपे असते. त्याचे रूपांतर मतांत करण्यासाठी काय करावे लागते याची जाणीव होईल. डॉ. जफर खान, विरोधी पक्षनेता, मनपा
‘व्हिजन’व ‘मिशन’ स्पष्ट करावे - राजकीय पक्षाशिवाय येथे साध्य साधले जात नाही. त्यामुळे तो काढणे एक गरज होती; पण फक्त कल्पना करून चालत नाही. येथे चांगल्या गोष्टी होऊ दिल्या जात नाहीत, त्यामुळे अण्णांना मोठा संघर्ष करावा लागेल. नागरिकांचा किती सहभाग मिळेल, हे सांगता येत नाही. आज देशात महात्मा गांधींनीही पक्ष काढला असता तर त्यांनाही त्रास झाला असता, याचा साक्षात्कार होईलच. अजय शहा, व्यापारी
जनता जनार्दन अण्णांच्या पाठीशी राहील. चांगले लोक सोबतीला आले तरी पुरेसे आहे. ही एक लढाई आहे, त्यामुळे त्यात अण्णा जिंकतीलच, असे आताच सांगता येणार नाही; पण या वयात ते लढण्यासाठी सज्ज झाले हीच चांगली आणि मोठी गोष्ट आहे. नागरिकांनीच चिंतन करण्याची गरज आहे. चंद्रकांत वाजपेयी, भ्रष्टाचारविरोधी लढय़ातील अग्रणी.
गटारातील साफसफाई बाहेर राहून करायची की आत उतरून हा अण्णांसमोर प्रश्न होता. आता त्यांनी मार्ग निवडला आहे. राजकारण्यांमुळे त्यांच्या ध्येयामध्ये र्मयादा येत होत्या. हक्काच्या मार्गाने ते निघाले आहेत. त्यांना काम करावे लागेल, ‘व्हिजन’व ‘मिशन’ स्पष्ट करावे लागेल. युवा पिढी त्यांच्या पाठीशी उभी राहिली तर नवी क्रांती होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. तो चुकीचा की योग्य हे काळ ठरवेल. उदय गिरधारी, अध्यक्ष, मसिआ
सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य हे वेगवेगळे आहेत. राजकारणात अनेक स्वार्थी लोक घुसतात आणि मूळ उद्देशापासून पक्षच भरकटतो. त्यामुळे अण्णांचा हा निर्णय चुकीचा आणि दुर्दैवी आहे. त्यामुळे देशाचा काहीही फायदा होणार नाही. जयंत शेवतेकर, नाट्यनृत्य कलावंत
पैशाशिवाय निवडणूक लढवा -
लोकशाहीत वैचारिक आणि सैद्धांतिक पर्यायांचे स्वागतच असते. अण्णांनी ज्यांच्यावर निष्ठा ठेवली, त्यांनीच अण्णांकडे लक्ष दिले नाही. देशात समाजवादी, साम्यवादी, उजवे, डावे असे अनेक पक्ष आहेत. अण्णांचा विचार अजून स्पष्ट झालेला नाही. ते राज्यव्यवस्थेच्या विरोधात आहेत; पण मुक्तव्यवस्थेला विरोध करत नाहीत. भ्रष्टाचार हाच मुद्दा त्यांनी पुढे केला. निवडणूक सुधारणा केल्या, पैशाशिवाय निवडणूक लढवून ती जिंकून दाखवली तर नवे काही होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. जयदेव डोळे, ज्येष्ठ पत्रकार.
भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषणाचा मार्ग सोडून... अण्णा राजकारणात
अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!