आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांसाठी नाना, मकरंदचे ‘अन्नदाता सुखी भव फाउंडेशन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकरी महिलेचे दु:ख जाणून घेताना नाना. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
शेतकरी महिलेचे दु:ख जाणून घेताना नाना. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद - दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावलेले अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी यासाठी स्वतंत्र फाउंडेशन काढण्याची घोषणा केली.
नाना पाटेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्याचे ‘अन्नदाता सुखी भव’ असे नामकरणही केले. फाउंडेशनची रीतसर नोंदणी करून मदतीसाठी बँक खाते क्रमांक जाहीर करू, असे ते म्हणाले.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत: नाना व मकरंद, प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, पत्रकार राजीव खांडेकर, पटकथा लेखक अरविंद जगताप ही मंडळी दोन महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. प्रथम नाना व मकरंद यांनी खिशातून ही मदत केली होती. नंतर देणारे असंख्य हात पुढे आले. आता आम्ही दोघे फक्त पोस्टमनचे काम करतो, असे ते अभिमानाने सांगतात. देणाऱ्याचे पैसे फक्त शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचते करण्याचे काम त्यांच्यावर आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या १२० शेतकऱ्यांच्या विधवांना सोमवारी त्यांनी मदत दिली. बळीराजाला मदतीची तर गरज आहेच; पण त्याहीपेक्षा आपल्या पाठीशी कोणी आहे, हे त्याला जाणवणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही हे करतोय, त्यासाठी आम्ही करणे महत्त्वाचे नाही तर सर्वांनी मिळून माणुसकीचे हे अभियान पुढे न्यावे, असे आवाहन नानाने केले.
इतरांकडे मदत देऊ नका
कोणाला योगदान द्यायचे असेल तर स्वत: नाना किंवा मकरंदशिवाय अन्य कोणाकडेही तूर्त आर्थिक मदत देऊ नये. फाउंडेशनचा बँक खाते क्रमांक जाहीर केला जाईल. त्यावर रक्कम जमा करावी, असे आवाहन आहे.
सांगा कसे जगू..? अन‌् सभागृह नि:शब्द!
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे सोमवारी औरंगाबादेत आले होते. कुटुंबीयांना भावना व्यक्त करण्यासाठी बोलावले तेव्हा ‘गळफास घेऊन ते सुटले, मला ना आई-वडील; ना सासू-सासरे, सांगा कसे जगू?’ असा सवाल करंजखेडा येथील कविता राऊत यांनी केला. त्यावर संत तुकाराम नाट्यगृहातील सारे नि:शब्द झाले.