आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योजनांचा वर्षाव: गावठाणांसाठी क्लस्टर स्कीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक शहराचा २०२६ पर्यंतचा विकास आराखडा शनिवारी जाहीर झाला असून, त्यात ७० मीटर उंचीच्या म्हणजेच जवळपास २३ मजल्यापर्यंतच्या गगनचुंबी इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. याबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेला तसेच निवडणुकीदरम्यान चर्चेत येणाऱ्या नाशिकच्या गावठाणाचाही क्लस्टर स्कीमच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यात विकसकाला चार चटई क्षेत्र निर्देशांक अर्थातच एफएसआय अनुज्ञेय करण्यात आला असून, तो गावठाणाच्या नियाेजनबद्ध विकासासाठी फायदेशीर ठरेल, असे मत नगररचना विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.
विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर त्याच्या प्रती आरक्षणांची स्थिती दर्शविणारे नकाशे बघण्यासाठी आणि घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. सकाळी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील फलकाजवळही एकच गर्दी झाली होती. दरम्यान, विकास आराखड्यातील ठळक बाबी चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. शहराचा विस्तार सध्या आडव्या पद्धतीने होत असून, आता २३ मजल्यापर्यंत उंच इमारतींना परवानगी देऊन उभ्या पद्धतीने विकासाचा मार्गही प्रशस्त केला आहे. यापूर्वी ४० मीटरपर्यंत उंच इमारतींना परवानगी होती.
दरम्यान, ७० मीटरपेक्षाही उंच इमारतींसाठी परवानगी देण्याचे अधिकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत. गावठाण पुनर्विकासाबरोबर याच भागातील निळ्या पूररेषेतील बांधकामांना विशिष्ट अटी-शर्थींद्वारे परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या बांधकाम परवानगीचा मार्गही मोकळा होणार आहे.
शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा शनिवारी जाहीर झाल्यानंतर महापालिका कार्यालयात लावलेला विकास आराखडा उत्सुकतेने पाहताना नागरिक.
भविष्यकालीन शहरीकरण क्षेत्र ४४२ हेक्टरवर
साधारणपणेनाशिक शहरालगत मात्र मनपा हद्दीत समाविष्ट खेड्यांचा विकास करण्यासाठी ४४२ हेक्टरवर भविष्यकालीन शहरीकरण क्षेत्र प्रस्तावित आहे. या क्षेत्रात नागरीकरण झाल्यानंतर पाणी, रस्ते अन्य मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर येईल. मात्र, अशा ठिकाणी आर्थिक स्थिती अन्य कारणांमुळे महापालिकेला सुविधा पुरवणे अवघड जात असल्यास अशा क्षेत्रात विकसकाने मूलभूत वा भौतिक सुविधा पुरविल्यास त्यास संबंधित क्षेत्र विकासाची परवानगी दिली जाणार आहे.
१२० किलोमीटर लांबीच्या सायकल ट्रॅकचा प्रस्ताव
शहरात पर्यावरणपूरक सायकल ट्रॅकला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या नवीन विकास आराखड्यात त्यादृष्टीने तरतूद करण्यात आली असून, पाटबंधारे विभागाचे पाट-कालवे तसेच काही नाल्यांच्या दुतर्फा तीन मीटर जागेत सायकल ट्रॅक साकारता येतील. याव्यतिरिक्त नदीलगतच्या हरित पट्ट्यात जमीनधारकाने सायकल ट्रॅक विकसित केल्यास १०० झाडे प्रति हेक्टरप्रमाणे लावल्यास उर्वरित जागेवर एफएसआय दिला जाणार आहे.
हरकती सूचनांसाठी ६० दिवसांचा अवधी
विकास आराखड्यातील आरक्षणे तसेच योजनांबाबत हरकती सूचनांसाठी ६० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्याची मुदत शनिवार अर्थातच २३ मे २०१५ पासून सुरू झाली असून, या कालावधीत संबंधित नागरिकांना जास्तीत जास्त सूचना कराव्यात. जेणेकरून आराखडा अधिक पारदर्शी लोकाभिमुख होऊ शकेल. या आराखड्याच्या प्रती वा नकाशे नगररचना सहसंचालक कार्यालय तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...