आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Toll Agitation Became Violated, Four Injured

टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; दगडफेकीत चौघे जण जखमी,एसटीचे 3 लाखांचे नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनसेने टोल वसुलीच्या विरोधात पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाला मंगळवारी (12 फेब्रुवारी) शहरात हिंसक वळण लागले. राज ठाकरेंना अटक झाल्याचे कळताच तोल सुटलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी एसटी महामंडळाच्या दहा बसेसवर दगडफेक केली. त्यात एका एसटीचालकासह तिघे जण जखमी झाले. बसचालकावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर इतर दोघे जण जखमी अवस्थेत गावाकडे निघून गेले. दगडफेकीमुळे महामंडळाचे किमान तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. बस सेवा बंद झाल्याने महाविद्यालय, शाळेतून घरी परतणार्‍या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना फटका बसला.


कालच घोषित केल्यानुसार मनसेच्या सर्व शाखांचे 110 पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी नऊच्या सुमारास पैठण रोडवरील महानुभाव आर्शमाजवळ रास्ता रोकोसाठी जमले. त्यांच्याभोवती तेवढय़ाच संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी आंदोलन करू नका, अशी विनंती केली. मात्र, पदाधिकार्‍यांनी माघार घेणार नाही, असे सांगितल्यावर त्यांना दहा मिनिटांचा वेळ देत नाथ व्हॅली शाळा व कमलनयन बजाजमार्गे वाहनांना वाट करून देण्यात आली.

घोषणाबाजी
नंतर अर्धा तास ‘या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय, हल्ला बोल, टोलमुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’अशी घोषणाबाजी करत पदाधिकार्‍यांनी परिसर दणाणून टाकला. मग पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करत ताब्यात घेऊन पोलिस आयुक्तालयात नेले. त्यात शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, विभाग अध्यक्ष राज वानखेडे, ज्ञानेश्वर डांगे, बिपीन नाईक, गौतम आमराव, सचिव आशिष सुरडकर, संतोष पाटील, गजानन गौडा, अमित भांगे, अँड. निनाद खोचे, संतोष पवार, सतनामसिंग गुलाटी, संजोग बडवे, अजय गटाने, रवी गायकवाड, अमोल खडसे, विशाल आहेर, शेख लतीफ, जमील कादरी, अरुण औताडे, लीला राजपूत, सपना ढगे, अनिता लोमटे, ज्योती बहुरे, वंदना काकरवाल, खालिदा बेग, हनुमान शिंदे, तुषार पाखरे आदींचा समावेश होता.


हलण्यासाठी जागाच ठेवली नाही
आंदोलक आक्रमक होतील, अशी शक्यता असल्याने आंदोलन स्थळी पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजित बोर्‍हाडे, पोलिस निरीक्षक बाबूराव कंजे यांच्यासह सीआरपीएफच्या जवानांची स्वतंत्र तुकडी मागवण्यात आली होती. त्यामुळे आंदोलकांना हलण्यास जागाच नव्हती. आंदोलन संपल्यानंतर पुढील 20 मिनिटांत वाहतूक सुरळीत झाली.


दगडफेकीचे सत्र : महानुभाव आर्शमाजवळ अटक केलेल्यांना पोलिस आयुक्तालयात आणले जात असतानाच राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाल्याची बातमी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि आतापर्यंत शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कार्यकर्त्यांचा एक गट सव्वाअकरा वाजता उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोरील रस्त्यावर धावला. त्यांनी एसटीवर दगडफेक सुरू केली. त्यात पुणे-कळमनुरी (एमएच20 बीएल 2935) बसचे चालक बाबूराव रामचंद्र जाधव, प्रवासी गोरख पालवे, सुनीता पालवे जखमी झाले. अचानक दगडफेकीने इतर प्रवासी घाबरून गेले होते. त्यांनी बसमधून खाली उतरत मिळेल त्या वाहनाने मध्यवर्ती बसस्थानकाचा रस्ता धरला होता. जाधव यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर पालवे कुटुंब कुठलाही उपचार न करता गावाकडे रवाना झाले. दगडफेकीची माहिती मिळाल्यावर उपायुक्त विजय पवार, पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, उपनिरीक्षक हरीश खटावकर, बबन मोगल आदी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आंदोलक पसार झाले होते. एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांनी याप्रकरणी जवाहरनगर आणि संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


अटक, सुटका : तोडफोडीच्या इराद्याने दुचाकीवर सिटी चौकात आलेले दोघे जण पोलिसांच्या हातून निसटले. त्यांची दुचाकी (एमएच 20 बीयू 7174) जप्त करण्यात आली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी दोघांना, तर क्रांती चौक पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे 108 पुरुष, तर 11 महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करत दुपारी त्यांची सुटका केली.


या ठिकाणी झाली तोडफोड : जालना रोडवरील रामगिरी हॉटेलसमोर सिटी बस (एमएच 14 बीटी 1915), अदालत रोडवरील तापडिया मैदानासमोर (एमएच 20 बीएल 2206), सर्मथनगरातील देवप्रिया हॉटेलसमोर (एमएच 20 बीएल 213), रंगीन दरवाजासमोर (एमएच 14 बीटी 1899), चुन्नीलाल पेट्रोल पंपासमोर (एमएच 20 8281), औरंगपुर्‍यातील अंबा-अप्सरा थिएटरसमोर (एमएच 20 डी 8346), उच्च न्यायालयासमोरील रस्त्यावर (एमएच 20 बीएल 2935), आकाशवाणी चौकात वाशीम-पुणे ही बस (एमएच 40 वाय 5446), पडेगावातील पोलिस कॉलनीसमोर शिरपूर-औरंगाबाद ही बस (एमएच 14 बीटी 2200) आणि सिडकोतील सौभाग्य मंगल कार्यालयासमोर ट्रकची (एमएच 20 बीटी 4713) काच फोडण्यात आली.