आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळाच्या गजरावर अभ्यास करून ‘एम्स’मध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थी नेहमी निगेटिव्ह मार्किंगला घाबरतात, परंतु प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक भागांमधील प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यासाचे नियोजन घड्याळाच्या गजरावर केल्यास कंटाळवाणा अभ्यास रंजक होतो व सहज यशोशिखर गाठता येते, हे शहरातील अपूर्व काबरा या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. त्याने अथक परिश्रमातून दिल्लीतील नामांकित ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) मध्ये प्रवेश मिळवला. या संस्थेत प्रवेश मिळवणारा तो मराठवाड्यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून देशभरातून साडेतीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यातून केवळ 34 विद्यार्थ्यांची निवड होते. त्यात अपूर्वने 17 वे स्थान पटकावले. वैद्यकीय क्षेत्रात देशपातळीवर पहिल्यांदा झालेल्या नीट परीक्षेतही त्याने राज्यातून 13 वा क्रमांक पटकावला. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण नाथ व्हॅली शाळेत झाले. त्यानंतर त्याने देवगिरी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. अपूर्वचे वडील डॉ. प्रवीण काबरा हे आर्थोपेडिक सर्जन असून आई डॉ. वंदना काबरा ह्या नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. आई-वडिलांप्रमाणे अपूर्वनेही डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले होते. ‘एम्स’मध्ये प्रवेश मिळाल्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. अभ्यासासह अपूर्व क्रीडा क्षेत्रातही पुढे आहे. टेबल टेनिसमध्ये त्याने सलग सहा वष्रे राज्याचे प्रतिनिधित्व केले. स्विमिंग, क्रिकेटमध्येही त्याने राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. बायोलॉजी ऑलिम्पियाड स्पध्रेत देशातून 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्येही पहिल्या 40 विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावत अपूर्वने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ‘नॅशनल सायन्सेस टॅलेंट सर्च एक्झामिनेशन’ आणि ‘नर्चरिंग एक्सलन्स अँड टॅलेंट’ या स्पर्धा परीक्षांमध्येही घवघवीत यश संपादन केले आहे.

आलटून पालटून प्रत्येक भाग पाहिला सोडवून
‘एम्स’च्या प्रवेश परीक्षेबद्दल अपूर्व म्हणाला, ही परीक्षा साडेतीन तासांची असते. 200 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक अचूक उत्तरासाठी एक गुण, तर चुकीच्या उत्तरासाठी -0.3 गुण आकारण्यात येतात. त्यामुळे माझ्यावर प्रचंड दबाव होता. अपूर्वने अभ्यास करताना प्रश्नांचे सहा भाग केले. ठरावीक वेळेत प्रत्येक भाग सोडवण्याच्या दृष्टीने त्याने घड्याळात सहा गजर लावले. आलटून पालटून प्रत्येक भाग सोडवून पाहिला. त्यानंतर अभ्यासक्रमाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला आणि यश मिळवता आले.

मराठवाड्यातील पहिला विद्यार्थी
एम्स ही संस्था 1956 पासून कार्यरत आहे. यामध्ये खुल्या वर्गातून 34 विद्यार्थ्यांचा, तर आरक्षणातून 34 आणि आंतरराष्ट्रीय स्टुडंट एक्स्चेंज उपक्रमाअंतर्गत 5 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. देशातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती एम्समध्ये उपचार घेतात. देशातील वैद्यकीय क्षेत्रातील ही एक महत्त्वाची संस्था मानली जाते. खडतर पर्शिम करून ‘एम्स’मध्ये प्रवेश मिळवणारा अपूर्व हा मराठवाड्यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
- डॉ. प्रवीण काबरा, वडील