आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत मतदारांनी सहिष्णू होण्याची गरज- मेधा पाटकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलित, भटके, आदिवासी आणि मोलकरीण महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुभाष लोमटे यांनी आपले आयुष्य वेचले. औरंगाबादच्या इतिहासात कधी नव्हे तो इतका धडाडीचा, अभ्यासू आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे मतदारांनी यंदा सहिष्णू होऊन लोमटे यांनाच मतदान करावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि ईशान्य मुंबईतील आम आदमी पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी केले. शनिवारी (22 मार्च ) यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी मार्गदर्शन केले, त्या वेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर लोमटे, प्रा. विजय दिवाण, जालन्याचे उमेदवार दिलीप म्हस्के, मनीषा चौधरी, अण्णा खंदारे आदींची उपस्थिती होती. पाटकर म्हणाल्या, औरंगाबादच्या मतदारांनी मागील पंधरा वर्षांत असा खासदार संसदेत पाठवला आहे, ज्यांनी लोकसभेत एकही कायदा करण्यासाठी चर्चेत भाग घेतला नाही अथवा मतदारसंघातील प्रश्न मांडले नाहीत. एवढेच काय, खैरे यांनी कधीही संसदेत भाषण केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अशा ‘मौनी’ खासदारांना निवडून देण्याऐवजी यंदा लोमटे यांनाच विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्याशिवाय जालन्याचे उमेदवार दिलीप म्हस्के यांनी तर अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात काम केले आहे. त्यांच्याकडे दृष्टी, अभ्यास, नवनिर्माण करण्याची जिद्द आहे. त्यामुळे जालन्याच्या येथील तीन विधानसभा मतदारसंघांतील जनतेलाही पाटकर यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. लोमटे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. दिवाण यांनी केले, तर खंदारे यांनी आभार मानले.
लोमटे यांनी फेस टू फेस काम केले
यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हा तरुण वर्गातील असून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी फेसबुकचा वापर करण्याची गरज आहे. लोमटे यांना सोशल नेटवर्किं गचा फारसा अनुभव नाही. त्यांना ‘फेसबुक’चा यंदा वापर करावाच लागेल. मला माहिती आहे की, त्यांनी आयुष्यभर फेस टू फेस काम केलेले आहे. पण फेसबुकचाही वापर करण्याची सूचना त्यांनी केली. उपस्थित कार्यकर्त्यांना प्रचारातील टिप्स देत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.